मुंबई । प्रतिनिधी -
‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत संपूर्ण राज्यात तसेच विशेषतः मुंबईत मोठय़ा प्रमाणात स्वच्छतागृहांची निर्मिती करण्यात आली असून स्वच्छतेबद्दल नागरिकांमध्ये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्पर्धा निर्माण व्हावी म्हणून केंद्र शासनाने शहरांना क्रमांक देणे सुरु केले असून मुंबई शहराला त्यामध्ये प्रथम स्थान मिळण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया, तसेच प्रत्येक व्यक्तिने दिवसातील ५ ते १० मिनिटे स्वच्छतेसाठी द्यावीत, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेने महात्मा जोतिबा फुले मंडईत १५ सप्टेंबर ते दिनांक २ ऑक्टोबर दरम्यान ‘स्वच्छता हीच सेवा – पंधरवडा’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. महापालिकेने आज एकाचवेळी ८० मंडयांमध्ये ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमांतर्गत स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे, असे सांगून या मोहिमेंतर्गत बृहन्मुंबईतील उद्याने, आस्थापना स्वच्छ तर दिसतीलच, मात्र नागरिकांनीही सदर उद्याने व मंडया कायमस्वरुपी स्वच्छ ठेवण्यासाठी सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तर आजपासून पुढील १५ दिवस महापालिकेची उद्याने, मंडयांमधील सर्वांगिण स्वच्छता कायमस्वरुपी रहावी, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. मुंबई शहर हे भारतातील सर्वांगिण स्वच्छता असणारे प्रथम क्रमांकाचे शहर ठरावे, यासाठी आपण सर्वांनी आजपासून प्रयत्न करुया, असे आवाहन उद्योग मंत्री व मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
केंद्र शासनाने दिलेल्या सुचनेनुसार राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिनांक १५ सप्टेंबर, २०१७ ते दिनांक २ ऑक्टोबर, २०१७ या कालावधीत ‘स्वच्छता हीच सेवा’ म्हणून ही मोहीम राबविण्यात येत आहे. मुंबईमध्ये एकूण ९४ महापालिका मंडया असून, त्यामध्येही हे अभियानचा सुरु राहणार आहे. दिनांक १७ सप्टेंबर, २०१७ रोजी सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत श्रमदान करुन ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे. तर दिनांक २४ सप्टेंबर, २०१७ रोजी समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करुन ‘समग्र स्वच्छता’ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दिनांक २५ सप्टेंबर, २०१७ रोजी शहरातील रुग्णालये, उद्याने, पुतळे व स्मारक, बस थांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची व्यापक प्रमाणात सफाई करण्यात येणार आहे. शहरातील सर्व कुटुंबांना व भाजी मंडई, बाजार संघटना, वाणिज्यिक क्षेत्रामध्ये सुक्या व ओल्या कचऱयासाठी मोठय़ा प्रमाणात वेगवेगळ्या रंगांच्या कचरा कुडय़ांचे (Dustbins) वाटप करण्यात येणार आहे. भाजी मंडई, बाजार स्थळे या ठिकाणी दुकानदार व व्यापाऱयांच्या मदतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मुंबईतील सर्व ऐतिहासिक वारसास्थळे, जलस्रोत, जलसाठा, पर्यटन स्थळे या ठिकाणी लोक सहभागातून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
म्हणून कार्यक्रमाला गेलो नाही -
‘स्वच्छता हीच सेवा – पंधरवडा’ अभियानाचा शुभारंभाच्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे निमंत्रण मला काल सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी फोन वरून दिले. मला निमंत्रण पत्रिका पोहचली नव्हती. पालिकेने मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून कार्यक्रम ठरवून घेतला. एक दिवस आधी मला फोन वरून कळवण्यात आले म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही. धोरणात्मक निर्णय घेताना सत्ताधारी म्हणून आयुक्तांनी आमच्याशी चर्चा करायला हवी.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर - मुंबई