मुंबई, दि. २१ : मुंबईतील कुलाबा ते सीप्झ या संपूर्ण भुयारी रेल्वेच्या भुयारी मार्गाच्या कामाचा शुभारंभ टनेल बोअरिंग मशीन भूगर्भातील शाफ्टमध्ये सोडून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. संपूर्ण अद्ययावत तंत्रज्ञान वापरून मेट्रोचे काम सुरू असून पर्यावरणपूरक, लोकांच्या हिताचा हा प्रकल्प आहे. मुंबईच्या व अभियांत्रिकी क्षेत्राच्या नव्या युगाची आज सुरुवात झाली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. धारावी मधील नयानगर येथील मेट्रोच्या कार्यस्थळी लाँचिंगचा कार्यक्रम झाला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई मेट्रो मधून ७० लाख प्रवासी वाहतूक होणार आहे. मेट्रोच्या ३३ किमी मार्गाचे काम संपूर्ण भुयारी असून, विशालकाय टनेल मशीनद्वारे भुयाराचे काम करण्यात येणार आहे. २ वर्ष हे काम सुरू राहणार आहे. टनेल बोअरिंग मशीन हे भूगर्भात २५ मीटर खाली खोदकाम करणार असल्याने कोणालाही त्रास होणार नाही. अशा १७ मशीन एकाचवेळी मुंबईमध्ये भुयार खोदण्याचे काम करणार आहेत. एकाचवेळी सिंगल लाईनचे काम देशात पहिल्यांदा मुंबईत होत आहे. मुंबईतील जुन्या तसेच अडचणीतील भागातूनही हा मार्ग जाणार आहे. वाहतुकीमुळे होणारे प्रदूषण मेट्रोमुळे कमी होणार आहे. तसेच मुंबईत कितीही पूर आला तरी मेट्रो थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला
मेट्रोबरोबरच उपनगरीय वाहतूक सक्षम करण्याचे काम सुरू आहे. एलेव्हेटेड रेल्वेचे काम सुरू करणार आहे. त्याचबरोबर या सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवासासाठी सिंगल तिकीटिंग प्रणाली उभारणार आहे. यासाठी अॅप तयार करणार असून कोड कंपनीबरोबर करार झाला आहे. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानक अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशिष शेलार, सरदार तारासिंग, तमिळ सिल्वन, मंगलप्रभात लोढा, राज पुरोहित, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू पी एस मदान, सह आयुक्त प्रवीण दराडे, मुंबई मेट्रोचे संचालक एस. के. गुप्ता, मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.