मुंबई, दि. २१ : वैद्यकीय क्षेत्रात विविध स्तरांवर संशोधन होत असून नवीन तंत्रज्ञानामुळे रोगाचे निदान आणि उपचार करणे सोपे झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा गरजू रुग्णांना झाला पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. जोगेश्वरी येथील ऑल क्युअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कॅथ लॅबचे उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, आरोग्य सुविधा लगेच पोहोचता याव्यात अशा ठिकाणी आणि सगळ्यांना परवडतील अशा किंमतीत उपलब्ध होणे आवश्यक आहे. सामान्यातील सामान्य व्यक्तीला उत्तमोत्तम आरोग्य सेवा मिळाल्या पाहिजेत. ऑल क्युअर स्पेशॅलिटी हॉस्पिटलमुळे जोगेश्वरीतील सामान्य नागरिकांना याचा लाभ घेता येईल.
ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची आवश्यकता आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची संख्या कमी असली तरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन टेलिमेडिसीनद्वारे ग्रामीण भागात सेवा देणे शक्य झाले आहे. मेळघाटातील हरीसाल येथे टेलिमेडिसीनद्वारे सेवा देऊन कुपोषणासारख्या प्रश्नावर काम करता आले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेमधून दोन कोटी कुटुंबांना आरोग्य सेवेचा लाभ घेता आला आहे. तर केवळ पैशाअभावी गरजू रुग्णांना उपचारापासून वंचित रहावे लागू नये, म्हणून मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमधून मदत करण्यात येते. याद्वारे २० हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी मदत देण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित इतर मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. डॉ. प्रफुल कुलकर्णी यांच्या हॉस्पिटलच्या या कार्यक्रमाला शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर, प्रसिद्ध सिनेनिर्माते राजकुमार हिराणी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.