मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईतील धोकादायक वृक्षांची तोडणी व फांद्यांची छाटणी यापुढे सेवा हमी कायद्यातून करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. वृक्षाबाबत आलेल्या तक्रारीचे निरसन १४ दिवसांच्या आत करणे पालिकेला बंधणकारक राहणार आहे. वृक्षांच्या तोडणी आणि छाटणीबाबत चालढकलपणा केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना लेखी उत्तर द्यावे लागणार आहे. वृक्षांबाबत वारंवार तक्रांरी करूनही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपांमुळे पालिकेने हा निर्णय घेतला आहे.
चेंबूरमध्ये स्वस्तिक पार्क परिसरात २० जुलैला नारळाचे झाड अंगावर पडून कांचन नाथ या महिलेचा मृत्यू झाला होता. तर २९ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात २४७ झाडे पडण्याच्या तक्रारी आल्या होत्या. मुंबईत अनेक प्रकारचे वृक्ष जीर्ण अवस्थेत असून त्यापैकी काही वृक्ष वेळोवेळी उन्मळून पडतात. त्यामुळे अनेकवेळा जीवित व वित्तहानी होते, अशा धोकादायक स्तिथीतील वृक्ष तोडणी व फांद्या छाटणीसाठी परवानगी वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे असे वृक्ष कोसळून जीवितहानीच्या घटना घडतात. त्यामुळे वृक्ष तोडणी आणि फांद्या छाटणीचा सेवा हमी कायद्यात समावेश करा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिष मकवानी यांनी केली होती. ही सूचना नुकतीच मंजूर झाली असून ती आयुक्तांचा अभिप्रायासाठी पाठविण्यात आली आहे. यावर आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वृक्ष तोडणी आणि फांद्या छाटणीचा सेवा हमी कायद्यात समावेश केल्यामुळे धोकादायक वृक्ष तोडणी व फांद्या छाटणीसाठी वेळेत परवानगी मिळेल, दुर्घटना टळतील आणि नागरिकांचे जीवही वाचेल, असे अनिष मकवाना यांनी स्पष्ट केले.