अंमलबजावणीसाठी ३० कोटींची तरतूद -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महापालिकेचा प्रस्तावित 'प्रारुप विकास आराखडा २०३४' हा अद्याप मंजूर व्हावयाचा असला, तरी या आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेल्या नागरी सेवा सुविधा विषयक बाबींची अंमलबजावणी करण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे. या अंतर्गत महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ४१ भूखंडांवर नवी उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रिडांगणे उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने प्रक्रिया सुरु झाली आहे. यामुळे भविष्यात मुंबईकरांना २५ नवी उद्याने, मनोरंजन मैदाने व १६ क्रिडांगणे उपलब्ध होऊ शकणार आहेत. याबाबतची निविदा प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. २१ लाख ८० हजार चौरस फुटांपेक्षा अधिक एकूण आकारमान असणा-या वेगवेगळ्या ४१ भूखंडांच्या विकासासाठी एकूण ३० कोटी रुपयांची प्रातिनिधिक तरतूद अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात करण्यात आली असल्याची माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली.
'प्रारुप विकास आराखडा २०३४' साठी महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी आराखडा तयार केला आहे. हा २० वर्षांचा आराखडा ४ पंचवार्षिक टप्प्यांमध्ये विभागण्यात आला आहे. महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे उपलब्ध झालेल्या माहितीनुसार सध्या महापालिकेची १ हजार ४२ उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रिडांगणे आहेत. यातील ३०५ भूखंडांवर क्रिडांगणे आहेत; तर उर्वरित ७३७ भूखंडांवर उद्याने, मनोरंजन मैदाने आहेत. आता प्रस्तावित विकास आराखड्यातील तांत्रिकदृष्ट्या मंजूर असलेली संबंधित आरक्षणे विकसित करावयाचा निर्णय घेण्यात आल्याने मुंबईकरांना २५ नवी उद्याने व खेळण्यासाठी १६ क्रिडांगणे उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील उद्यानांची एकूण संख्या ७६२; तर क्रिडांगणांची संख्या ३२१ एवढी होणार आहे. नव्याने विकसित करण्यात येणारी २५ उद्यानेमी, मनोरंजन मैदाने यापैकी सर्वात मोठे उद्यान, मनोरंजन मैदान हे 'के पश्चिम' विभागातील आंबिवली, ओशिवरा परिसरातील ५ लाख २८ हजार १५४ चौरस फुटांच्या भूखंडावर; तर १६ क्रिडांगणांपैकी सर्वात मोठे क्रीडांगण हे मालाड परिसरातील १ लाख ५ हजार ४१६ चौरस फुटांच्या भूखंडावर प्रस्तावित करण्यात आले असल्याचे दराडे यांनी सांगितले.
याचप्रमाणे २ लाख २२ हजार ४२७ चौरस फूट आकाराच्या आकुर्ली परिसरातील(आर दक्षिण) भूखंडावर उद्यान, मनोरंजन मैदान प्रस्तावित करण्यात आले आहे. तर माहुल परिसरातील (एम पश्चिम) १ लाख ८९ हजार ५१७ चौ. फू., मुलुंड परिसरातील(टी) १ लाख ४८ हजार ४८८ चौ. फू., वांद्रे परिसरातील (एच पश्चिम) १ लाख ३५ हजार ८२३ चौ. फू., मारवली, राहुल नगर(एम पूर्व) परिसरातील १ लाख ३ हजार ६६१ चौ. फू. आणि भांडुप परिसरातील(एस) १ लाख २ हजार ९६९ चौरस फुटांच्या भूखंडावर देखील उद्यान /मनोरंजन मैदान प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिकेच्या ताब्यातील ज्या ४१ भूखंडांवर उद्याने, मनोरंजन मैदाने, क्रिडांगणे विकसित करण्याचे प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती दराडे यांनी दिली.