एकाच कंत्राटदाराला वेगवेगळ्या परिमंडळात वेगळे दर -
मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईमधील कचरा निश्चित केलेल्या ठिकाणी टाकण्यासाठी महापालिकेने भाड्याने चालवल्या जात असलेल्या गाड्यांचे कंत्राट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाड्यावर घेतल्या जाणाऱ्या टेंम्पो गाड्यांसाठी महापालिका एका वर्षासाठी तब्बल 5 कोटी रुपये खर्च करणार आहे. तसा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. सात परिमंडळासाठी वेगवेगळे प्रस्ताव सादर करण्यात आले असून या प्रस्तावामध्ये एकाच कंत्राटदाराला वेगवेगळ्या परिमंडळात प्रतिट्रीपसाठी वेगळे दर लावण्यात आल्याने स्थायी समितीत नगरसेवक प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेच्या 24 विभागातून कचरा संकलित केला जातो. त्यासाठी पालिकेच्या व कंत्राटी गाड्यांचा वापर केला जातो. गाड्यांवरील खर्च कमी करण्यासाठी पालिकेने कंत्राटी टेंम्पो गाड्या घेण्यास सुरुवात केली. त्यासाठी कंत्राट देण्यात आले होते. मागील कंत्राटाचा कालावधी 31 मे 2017 ला संपला आहे. घन कचरा व्यवस्थापन विभागाने दर पत्रक मागवून या कंत्राटदाराना काम दिले त्याचाही कालावधी 16 ऑगस्टला संपला आहे.
पालिकेने आता नव्याने कंत्राट काढले असून त्यानुसार परिमंडळ 1 चे कंत्राट भवानी ट्रेडर्सला प्रतिट्रीप 1569 रुपये या दराने वर्षभरासाठी 71 लाख 47 हजार रुपये अदा केले जाणार आहेत. परिमंडळ 2 चे कंत्राट भवानी ट्रेडर्सला प्रतिट्रीप 1485 रुपये या दराने वर्षभरासाठी 56 लाख 37 हजार रुपये अदा केले जाणार आहेत. परिमंडळ 3 चे कंत्राट लक्ष्य इंटप्राइजला प्रतिट्रीप 1500 रुपये या दराने वर्षभरासाठी 79 लाख 71 हजार रुपये अदा केले जाणार आहेत.
परिमंडळ 4 चे कंत्राट सनरेश इंटप्राइजला प्रतिट्रीप 1446 रुपये या दराने वर्षभरासाठी 87 लाख 82 हजार रुपये अदा केले जाणार आहेत. परिमंडळ 5 चे कंत्राट लिंब्रा इंटप्राइजला प्रतिट्रीप 1511 रुपये या दराने वर्षभरासाठी 74 लाख 56 हजार रुपये अदा केले जाणार आहेत. परिमंडळ 6 चे कंत्राट भवानी ट्रेडर्सला प्रतिट्रीप 1503 रुपये या दराने वर्षभरासाठी 91 लाख 28 हजार रुपये अदा केले जाणार आहेत. तर परिमंडळ 7 चे कंत्राट स्पॉट एंड साईट कलेक्शनला प्रतिट्रीप 1543 रुपये या दराने वर्षभरासाठी 76 लाख 14 हजार रुपये अदा केले जाणार आहेत.