स्थायी समितीत नगरसेवकांची मागणी -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेत सुरक्षारक्षकांची शेकडो पदे रिक्त आहेत. सुरक्षा रक्षकांची पदे रिक्त असल्याने महापालिका कार्यालये, रुग्णालये तसेच मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षा रक्षकांच्या रिक्त पदांकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने तलावांच्या ठिकाणी गैरप्रकारातही वाढ झाली आहे. यामुळे पालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या रिक्त असलेल्या ९६८ जागा त्वरित भराव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीत केली.
महापालिकेच्या विविध विभाग कार्यालयांत, रुग्णालयांच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची कमतरता असताना येथील जागा भरण्यास प्रशासनाचे दुर्लोक्ष आहे. तलावांच्या ठिकाणी तर सीसीटिव्ही कॅमेरे व सुरक्षा रक्षक उपलब्ध नाही. सायन तलाव, सायन किल्ला येथे सुरक्षा रक्षक नसल्याने येथे गर्दुळ्यांचा सुळसुळाट झाला असून ही तलावे असुरक्षित आहेत. याकडे भाजपच्या नगरसेविका राजश्री शिरवडकर व शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी लक्ष वेधले. सायन तलाव अडीच वर्षापूर्वी पालिकेच्या ताब्यात आले. या तलावांत साडेचार हजार गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. सर्वात मोठे असलेल्या या तलावाकडे पालिकेने दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने या तलावाच्या स्वच्छतेबाबत व सुरक्षेच्यादृष्टीने तातडीने लक्ष वेधावे असेही सातमकर यांनी सांगितले. राजश्री शिरवडकर यांनी तलावाच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणे महत्वाचे आहे, मात्र त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने येथे असुरक्षिततेचे वातावरण आहे. गर्दुल्यांचा तर हैदोस सुरू असल्याने येथे येणा-या -जाणा-यांना असुरक्षित वाटते. त्यामुळे येथे तातडीने सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी शिरवडकर यांनी केली. पवई तलावाच्या ठिकाणीही अपुरी सुरक्षा व्यवस्था असून तेथील देखभाल नीट केली जात नाही. ऑक्सिजन तर बंद अवस्थेत आहे, असे शिवसेनेचे नगरसेवक सदानंद परब यांनी सांगितले. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या ९६८ रिक्त जागा पालिकेने तातडीने भराव्यात, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी यावेळी केली.