कचरा वर्गीकरणाच्या फतव्या विरोधात पालिका सभागृह तहकूब - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2017

कचरा वर्गीकरणाच्या फतव्या विरोधात पालिका सभागृह तहकूब


भाजपा, काँग्रेसचा सभात्याग -
कचरा आयुक्तांच्या घरात व वॉर्ड कार्यालयात टाकण्याचा इशारा -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईतील कचरा वर्गीकरणाबाबत मुंबई महानगरपालिकेने काढलेला फतवा त्वरित रद्द करावा या मागणीसाठी पालिका सभागृह तहकूब करण्यात आले. यावेळी २ ऑक्टोबरपासून सोसायटीमधील कचरा वर्गीकरणाबाबतचे परिपत्रक परत घेतले नाही तर वॉर्ड ऑफिस आणि पालिकेच्या सनदी अधिकाऱ्यांच्या घरात कचरा टाकण्याचा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. तसेच मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचा प्रशासनाकडून अवमान केला जात असल्याने प्रशासनाच्या कारभाराचा निषेध करण्यात आला.

मुंबई महानगरपालिकेने २ ऑक्टोबर पासून सोसायटीमधील कचरा न उचलण्याचे परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकाबाबत रवी राजा यांनी निवेदन केले. हे परिपत्रक नगरसेवक, सभागृह, गटनेते, स्थायी समिती तसेच महापौरांना विश्वासात न घेता काढल्याने आयुक्तांच्या या फतव्याचा रवी राजा यांनी निषेध केला. कायद्या प्रमाणे कचरा वर्गीकरणाची जबाबदारी पालिकेची आहे. पालिका हि जबाबदारी नागरिकांवर ढकलत आहे. आधीच मुंबई हे आजाराचे शहर बनले आहे त्यात कचरा न उचलल्यास मुंबईत आणखी रोगराई पसरेल असे रवी राजा यांनी सांगितले. पालिका प्रशासन लोकांकडून कचरा उचलायचे पैसे घेते याची आठवण करून देत पालिका आयुक्त स्वतःच नियमांचा भंग करत असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. पालिकेने कचरा वर्गीकरण करण्याच्या मशीनचा धंदा करत आहे का ? कचरा वर्गीकरण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना पालिका प्रॉपर्टी टॅक्समध्ये सूट देणार का ? एफएसआय वाढवून देणार का ? असे प्रश्न उपस्थित रवी राजा यांनी उपस्थित केले.

सन २०१४ पासून आज पर्यंत परिस्थिती सुधारलेली नाही. माझ्या विभागात ४० सोसायट्या कचरा वर्गीकरण करत असल्या तरी पालिका मात्र कचरा वर्गीकरण करत नाही. पालिकेला इतक्या वर्षात शास्त्रोक्त पद्धतीने डम्पिंग ग्राउंड बंद करता आलेले नाही. डम्पिंगवरून न्यायालयाने पालिकेला अनेक वेळा फटकारले आहे. पालिका कचरा कमी करत नसल्याने मुंबईतील विकासाची कामे बंद आहेत. यामुळे पालिकेने कचरा वर्गीकरणाची जबाबदारी नागरिकांवर ढकलली आहे. पालिकेने एक हजार टन कचरा कमी केला असा दावा केला आहे. मग पालिकेने या कचऱ्याच्या बदल्यात नागरिकांकडून पैसे का घेतले ? असा प्रश्न उपस्थित करत या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी केली. कचरा वर्गीकरणाचे परिपत्रक पालिकेने मागे घेतले नाही तर वॉर्ड कार्यालयात कचरा टाकण्याचा इशारा कोटक यांनी दिला.

समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी कचरा वर्गीकरण करण्यासाठी कित्तेक कंपन्या पुढे आल्या. मात्र या कंपन्यांना कामच देण्यात आले नसल्याने त्या कंपन्यांच्या प्रस्तावाच्या फायली धूळ खात पडल्या आहेत. पालिकेने सदर परिपत्रक मागे न घेतल्यास विभागातील कचरा वॉर्ड कार्यालयात टाकण्याचा इशारा रईस शेख, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी दिला. आयुक्त मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांना विश्वासात घेत नाहीत. आयुक्तांच्या या मनमानी कारभाराचा निषेध करत कचरा वर्गीकरणाचे परिपत्रक मागे घ्यावे व सभा तहकूब करावी अशी मागणी सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केली. यशवंत जाधव यांच्या मागणी नुसार महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभा तहकूब केली.

भाजपा काँग्रेसचा सभात्याग -
मुंबई महापालिका सभागृहात कचरा वर्गीकरणावर चर्चा सुरु असताना महापौर विश्वनाथ माहाडेश्वर यांनी भाजपा आणि काँग्रेसच्या नगरसेवकांना बोलण्याची संधी न दिल्याने दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांनी सभात्याग केला.

शिवसेना परिपत्रकाविरोधात आंदोलन करणार -
मुंबई महापालिका प्रशासन २ ऑक्टोबरपासून सोसायट्यांमधील कचरा उचलणे बंद करण्याचे जाहीर केले आहे . याचा शिवसेनेचा तीव्र विरोध असून करदात्या मुंबईकरांचा कचरा उचलणे हे पालिकेचे बंधनकारक कर्त्यव्य आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडच्या अपयशामुळे प्रशासनाने कचऱ्याची जबाबदारी मुंबईकरांवर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. पालिका आयुक्तांनी काढलेले परिपत्रक मागे न घेतल्यास शिवसेना या विरोधात आंदोलन करेल असा इशारा शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.

Post Bottom Ad