मुंबई । प्रतिनिधी -
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि बहुजन समाज पार्टीला मानत नसल्याचे वक्तव्य पालिकेच्या भांडुप एस वार्डचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांनी केल्याने संतापलेल्या बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र प्रभारी महासचिव अशोक सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज एस वार्ड कार्यालयावर आंदोलन केले. यावेळी सहाय्यक आयुक्तांनी माफी मागावी अश्या घोषणांनी कार्यालयाचा परिसर आंदोलनकर्त्यांनी दणाणून सोडला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की बसपा पार्टीचे महाराष्ट्र महासचिव अशोक सिंह यांनी शुक्रवार दिनांक 8 सेप्टेंबर रोजी एस वार्ड पालिकेचे सहायक आयुक्त संतोष धोंडे यांची भेट घेऊन भांडुप मधील पालिकेकडून होत असलेल्या भ्रष्टाचारा बाबत निवेदन सादर केले होते. यावेळी काही बाबींवर चर्चा करण्याचे ठरविले असताना सहायक आयुक्त संतोष धोंडे यांनी सिंह यांच्या निवेदनाला कोणताही प्रतिसाद न देता दुर्लक्ष केले. त्यावेळेस अशोक सिंह यांनी आपल्या जवळ असलेले पक्षाचे ओळखपत्र त्यांना दिले असता धोंडे यांनी बसपा पक्षाला व बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मानत नसल्याचे वक्तव्य केले. यावर संतापलेल्या अशोक सिंह यांनी तात्काळ भांडुप पोलीस स्थानक गाठून घडलेला प्रकाराची लेखी स्वरूपात तक्रार देऊन सहाय्यक आयुक्त संतोष धोंडे यांच्या विरोधात वार्ड कार्यालयावर आंदोलन आज आंदोलन केले. यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांचे आंदोलन लक्षात घेऊन सहाय्यक आयुक्तांनी नमती भूमिका घेत माफी मागितल्याचे बसपाचे महाराष्ट्र महासचिव अशोक सिंह यांनी सांगितले.
माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा झाला -
असं वक्तव्य मी केले नसून मात्र माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा झाला असेल तर मी पक्षाची माफी मागतो . देशाचे संविधान हे बाबासाहेबानी लिहिलेल्या घटनेवर चालते आहे . मी सुद्धा बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होते . बोलण्याच्या अर्थमुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो.
- संतोष धोंडे, सहाय्यक आयुक्त एस विभाग