मुंबई | प्रतिनिधी -
मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी भायखळा आणि वांद्रे परिसरातील मनोरंजन उद्याने व खेळाच्या मैदानांत भूयारी वाहनतळ उभारण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली आहे. यामुळे मुंबईतील भूयारी वाहनतळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
मुंबईत पार्किंगची समस्या भेडसावते आहे. अनेक ठिकाणी रस्ते, पदपथ, इमारती समोर, चौकात जागा मिळेल तिथे दुचाकी, चार चाकी वाहने उभी केली जात असल्याने नागरिकांना चालणे देखील मुश्किल होते. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडी होते. वाहन चालकांना यातून वाहन चालवण्यासाठी कसरत करावी लागते. मुंबईतील वाढती लोकसंख्या आणि वाहनांच्या संख्येत सार्वजनिक वाहनतळ सुविधा कमी पडत आहे. यावर उपाययोजना म्हणून पालिकेने मनोरंजन उद्याने व खेळाची मैदानांखाली अद्यावत भूमिगत वाहनतळ बांधण्याचा निर्णय घेतला आहे. भायखळा येथील झुला मैदान, वांद्रे फोर्टच्या आजूबाजूचा परिसर आणि वांद्रे लिंक रोडवरील रावसाहेब पटवर्धन उद्यानात भूमिगत वाहनतळ उभारण्यात येणार आहे. वाहनतळासाठी आराखडे तयार केले जाणार असून महापालिकेने याकरिता पाच वास्तुतज्ञ्नांची निवड केली आहे. स्थायी समितीने याबाबतच्या प्रस्तावाला बुधवारी मंजुरी दिली. प्रशासनाने सदर प्रस्ताव समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला होता.