मुंबई । प्रतिनिधी -
पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रोड आणि मध्य रेल्वेच्या परेल स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलावर आज सकाळी झालेल्या दुर्घटनेनंतर महापालिका आरोग्य खात्याने तात्काळ घटनास्थळी आपली आरोग्य यंत्रणा मदतीला पाठवली. पालिकेने केईएम रुग्णालयातील ४ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, १० जणांचा कर्मचारी वर्ग आणि १४ रुग्णवाहिका यांच्या साहाय्याने मदत कार्य केले, या दुर्घटनेतील जखमींवर केईएम रुग्णालयात तातडीने उपचार सुरु आहेत. अशी माहिती महापालिका उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली.
दुर्घटनेतील काही जखमींना रक्ताची तातडीने आवश्यकता होती. रुग्णालयात रक्त उपलब्ध होते मात्र रक्त कमी पडायला नको म्हणून सायन रुग्णालयातुन तातडीने रक्त उपलब्ध करण्यात आले, मात्र पालिकेने रक्त कमी पडल्याने रक्तदान करावे असे कोणत्याही प्रकारचे आवाहन केले नव्हते. रक्तदानांबाबत मुंबई पोलिसांनी जनतेला आवाहन केलं होते, अशी माहिती उपायुक्त सुधीर नाईक यांनी दिली. तसेच केईएममध्ये सध्या २२ जण मृत आहेत तर ३६ जखमींवर उपचार सुरु आहेत. त्याचप्रमाणे, केईएममध्ये तात्काळ जखमींच्या मदतीसाठी सर्जन डॉक्टरांचा समावेश असलेली ४० डॉक्टरांची टीम २०० कर्मचारी वर्ग, औषधे आदी तयारी करण्यात आली होती, अशी माहिती नाईक यांनी दिली.