मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत 29 ऑगस्टला झालेल्या मुसळधार पावसामुळे तुंबलेल्या मुंबईला प्रशासन व सत्ताधारी जबाबदार असल्याचा जोरदार आरोप करीत विरोधकांनी प्रशासनाला फैलावर घेतले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे मुंबईत पाणी साचले. याचा निषेध करीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाने सभात्याग केला. मात्र पाणी तुंबल्यानंतर सत्ताधा-यांवर टीका करणा-या पालिकेतील पहारेकरी भाजप यावर काहीही न बोलता सत्ताधा-यांच्या बाजूने उभा राहिला. स्थायी समितीत भाजपची ही दुटप्पी भूमिकेचे आश्चर्य व्यक्त केले जाते आहे. 29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. यांत काहींचा बळीही गेला. कोट्यवधी रुपये खर्च करून पंपिंग स्टेशन उभारण्यात आली, तरीही पाण्याचा वेळेत निचरा करता आला नाही. पालिका प्रशासनाची यंत्रणा फेल ठरली असल्याचा निषेध म्हणून बुधवारी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सभा तहकूबीचा ठराव मांडला. यावेळी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर तुंबलेल्या मुंबईनंतर पालिका व प्रशासनाचे दावे कसे फोल ठरले याचा पाढा रवी राजा यांनी वाचला. विरोधकांनी प्रशासनाला याचा जाब विचारून फैलावर घेतले. मुंबईत मुसळधार पाऊस झाल्यास करण्यात येणारी उपाययोजना केली गेली आहेत, रस्ते, नाले सफाईची कामे समाधानकारक झाली असल्याने यंदा मुंबई तुंबणार नाही, असा दावा महापालिका प्रशासनाने केला होता. पावसापूर्वी नाले, रस्ते यांच्यावर अनेकेवळा चर्चा झाल्या. नाले सफाईची पाहणीही करण्यात आली होती. मात्र तरीही पावसाचे पाणी साचून मुंबई तुंबली. कोट्यवधी रुपये खर्च करून पंपिंग स्टेशन उभारण्यात आली होती. मात्र यातील काही बंद ठेऊन ती उशिरा सुरू करण्यात आली होती. वेध शाळेने पावसाचा अंदाज दोन दिवसापूर्व सांगितला होता. असे असताना उपाययोजना का केली नाही, असा सवालही विरोधकांनी विचारला. पालिकेचे आपत्कालीन नियंत्रण कक्षही यावेळी निष्प्रभ ठरले. अत्य़ावश्यक सेवेसाठी असलेला नंबर लागत नव्हता. पालिकेचा इतर यंत्रणेशी समन्वय नसल्याने लोकांपर्यंत मदत पोहचत नव्हती. पालिकेचा स्टाफही पाहिजे तेथे मदतीसाठी दिसला नाही. तासाभरातच पाणी साचले. पंपिंग स्टेशन उभारली आहेत, त्याचा परिणाम काहीही दिसून आला नाही. पाण्याचा निचरा होताना दिसत नव्हता. पावसापूर्वी आयुक्त म्हणाले यंदा पाणी साचणणार नाही, आता 50 मिमी पाऊस पडल्य़ाने पाणी तुंबतेच असे म्हणत जबाबदारी झटकत आहेत. पालिकेची संपूर्ण यंत्रणा फेल ठरली आहे. याचा निषेध करीत पालिका विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सभा तहकूबीची जोरदार मागणी केली. याला सपा, राष्ट्रवादी, मनसेने पाठिंबा दिला. यावेळी भाजपने मात्र काहीही न बोलता गप्प बसण्याची भूमिका घेतली. 26 जुलै 2005 मध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर सूचवण्य़ात आलेल्या उपाययोजनांची अमलबजावणी अद्याप झालेली नाही, त्यानंतर काहीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे झकेरिया य़ांनी सांगितले. कुर्ला थोड्या पावसांतही तुंबतो. 29 ऑगस्टच्या पावसात झोपडी पाण्याखाली गेली. अनेक रहिवाशांना त्याचा फटका बसला. येथे 15 नाले आहेत, यांची सफाई वरवरची झाली आहे. अधिकारी आयुक्तांच्या आदेशाची अमलबजावणी करीत नाहीत. मुसळधार पावसानंतर येथील रहिवाशांच्या व्यथा मनसेचे गटनेते दिलीप लांडे यांनी मांडून प्रशासनाचे लक्ष वेधले. झकेरीया यांनी 2005 नंतर काहीही सुधारणा झालेली नाही. पालिकेची इतर यंत्रणेसह आपत्कालीन नियंत्रण कक्षही फेल ठरले आहे, असा आरोप केला.