`ऑफिसर ऑफ द मंथ' बहुमानाने रश्मी लोखंडे यांचा गौरव - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2017

`ऑफिसर ऑफ द मंथ' बहुमानाने रश्मी लोखंडे यांचा गौरव


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत २९ ऑगस्टला अतिवृष्टीमुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. या दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे अत्यंत तत्परतेने व सक्षमपणे विविध जबाबदा-या पार पाडण्यात आल्या. तसेच अतिवृष्टीशी संबंधित असणा-या सर्वच यंत्रणांशी सुयोग्य समन्वय साधून अपेक्षित कार्ये वेळेत पूर्ण करण्यात आली. या सर्व बाबी ज्यांनी आपल्या सहका-यांसह पूर्ण केल्या त्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी उर्फ संगीता राजेंद्र लोखंडे यांचा 'सप्टेंबर २०१७' या महिन्यासाठी 'महिन्याचे मानकरी' अर्थात 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने गौरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आयोजित महापालिका अधिका-यांच्या मासिक आढावा बैठकी दरम्यान `सप्टेंबर -२०१७' या महिन्यासाठी `महिन्याचे मानकरी' (ऑफिसर ऑफ द मंथ) या बहुमानाने रश्मी उर्फ संगीता लोखंडे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड, उपायुक्त (विशेष) निधी चौधरी, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व खातेप्रमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

२९ ऑगस्टच्या अतिवृष्टी दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापन खात्याच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी अक्षरशः दिवस रात्र कार्यालयात उपस्थित राहून व आपल्या सहका-यांसह अविरतपणे काम करुन त्यांना सोपविलेले कार्य सक्षमपणे पूर्ण केले आहे. या दरम्यान त्यांनी विविध यंत्रणांशी सातत्याने संपर्क ठेऊन सुसमन्वयन साध्य करण्यासोबतच आपल्या विभाग प्रमुखांच्या अनुपस्थितीत उल्लेखनीय काम केले आहे,'' या शब्दात महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या उपप्रमुख अधिकारी लोखंडे यांचा गौरव केला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे या १९९५ पासून महापालिकेच्या सेवेत असून वर्ष १९९९ पासून त्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात कार्यरत आहेत. जुलै २०१५ पासून त्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या उपप्रमुख अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

Post Bottom Ad