घाटकोपरमधील राजकीय पुढाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर सोमवारी पालिकेची कारवाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2017

घाटकोपरमधील राजकीय पुढाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर सोमवारी पालिकेची कारवाई


मुंबई । प्रतिनिधी -
घाटकोपर इंडस्ट्रिअल रोडवरील २ गाळे, तर महिंद्रा पार्क येथील २ आणि हिंगवाला लेन येथील २ गाळ्यांवर शनिवारी तोडक कारवाई करण्यात आल्याची माहिती एन विभागाचे सहायक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी दिली. तोडक कारवाई झालेल्यापैकी दोन गाळे विद्यमान शिवसेना नगरसेवक आणि एन प्रभाग समितीचे अध्यक्ष तुकाराम (सुरेश) पाटील यांची असल्याची चर्चा आहे. भाजपाच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी न्यायालयात केलेल्या याचिकेनंतर महापालिकेने ही धडक कारवाई केल्याचे समजते. त्यामुळे अनधिकृत बांधकाकामांमुळे सुरेश पाटील यांचे नगरसेवकपद धोक्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान घाटकोपर मधील राजकीय पुढाऱ्यांच्या अनधिकृत बांधकामांवर सोमवारी मोठी कारवाई पालिका करणार असल्याने या पुढाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

घाटकोपर येथे गेल्या काही वर्षात अनधिकृत बांधकामे झपाट्याने वाढली आहेत. जुलै महिन्यात घाटकोपर एलबीएस रॉड येथील सिद्धी साई इमारत कोसळली होती. यानंतर या दुर्घटनेला जबाबदार असलेल्या सुनिल सितप यांची अनधिकृत बांधकामे पालिकेच्या रडारवर आली होती. याच दरम्यान सितपने विद्यमान प्रभाग क्रमांक १२७ मधील शिवसेना नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांच्यासोबत अनेक भागांमध्ये अनधिकृत बांधकामे केली असून ही सर्व बांधकामे तोडण्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. या तक्रारींपैकी घाटकोपर इंडस्ट्रियल रोडवरील अमृतनगर चौक येथे सुमारे १२५ अनधिकृत दुकाने तसेच गाळे बांधले असल्याचे पालिकेच्या निदर्शनास आले होते. यामध्ये सितप यांचे पाच गाळे तर नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांचे दोन गाळे होते. गाळा क्रमांक ३६ आणि ३७ हे दोन गाळे पाटील यांच्या नावावरच असून हे दोन्ही गाळे त्यांनी भाडेतत्वावर चालवण्यास दिले होते. या दोन्ही गाळ्यांवर शनिवारी महापालिकेच्या एन विभागाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने तोडक कारवाई केली. अनधिकृत बांधकामांपैकी सितपच्या एका बांधकामाबाबत कागदोपत्री पुरावे पूर्णपणे तपासले जात आहेत. घाटकोपर इंडस्ट्रिअल इस्टेट मार्गावर एकूण १२५ अनधिकृत बांधकामे निश्चित करण्यात आली आहेत. ही सर्व बांधकामे राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची आहेत. यातील अनेक बांधकामांबाबत न्यायालयीन प्रकरणे होती. त्यातील काही निकालात निघाली आहेत. काही रद्द झाली आहेत. त्यामुळे या सर्व अनधिकृत गाळ्यांवर सोमवारी कारवाई करण्यात येणार असल्याचे कापसे यांनी सांगितले.

बांधकामे माझी नाहीत - 
ही अनधिकृत बांधकामे माझी नाहीत. ही बांधकामे २०१५ मध्ये विकली असून त्या बांधकामांशी माझा कोणताही संबंध नाही.
- तुकाराम पाटील,
- शिवसेना नगरसेवक व प्रभाग समिती अध्यक्ष "एन" विभाग

नगरसेवक पद रद्द करा -
प्रभाग क्रमांक १२७ चे नगरसेवक तुकाराम (सुरेश) पाटील यांची अनधिकृत बांधकामे असल्याची तक्रार आपण केली होती. हीच बांधकामे तोडून महापालिकेने ती अनधिकृत असल्याचं शिक्कामोर्तब केलं आहे. त्यामुळे महापालिका निवडणूक लढवताना दिलेल्या घोषणा पत्रानुसार महापालिका अधिनियम १८८८च्या १६ (१) डी नुसार त्यांचे महापालिका सदस्यत्व रद्द करण्याची मागणी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे करणार आहे. पाटील यांनी दोन वर्षांपूर्वी गाळे विकले असतील तर गाळ्यांचे गुमास्ता परवान्याचे नुतनीकरण का केले ? पाटील हे रिलायन्स एनर्जीचे विजेचे बिल का भरत आहेत ?
- रितू तावडे, माजी नगरसेविका

Post Bottom Ad