मुंबई । प्रतिनिधी -
केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी करामुळे पालिकेने १ जुलै नंतरच्या सर्व निविदा आणि वर्क ऑर्डर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका मुंबईच्या विकासाला आणि नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सुविधांना बसू लागला आहे. घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयाच्या दुरुस्तीचे तसेच बर्वे नगर येथील हिंदू स्मशान भूमीच्या शुशोभीकरणाचे काम रखडणार आहे.
१ जुलैपासून जीएसटी लागू झाल्याने ज्या निविदांमध्ये हा कर लावण्यात आला नव्हता त्या निविदा व दिलेल्या वर्क ऑर्डर पालिकेने रद्द केल्या आहेत. राजावाडी महापालिका रुग्णालय परिसरातील तळ अधिक दोन मजल्यांच्या जुन्या इमारतीची मोठ्या प्रमाणात व्यापक दुरुस्ती करण्यासाठीही निविदा मागवून कंत्राट कंपनीची निवड करण्यात आली आहे. 2.62 कोटी रुपयांच्या कंत्राटासाठी मोक्ष कन्स्ट्रक्शन या कंपनीची निवड करण्यात आली आहे. याबाबतचा प्रस्ताव आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाने आयुक्तांच्या माध्यमातून स्थायी समितीपुढे मंजुरीला पाठवला आहे. तसेच घाटकोपर पश्चिम येथील बर्वेनगर स्मशानभूमी सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 1.29 कोटींच्या कंत्राटाकरता कंत्राटदाराची निवड केली आहे. परंतु, या कंत्राट कामांसाठी निविदांमध्ये जीएसटी कराची आकारणी न केल्यामुळे हे कंत्राट रद्द केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. असे अनेक प्रस्ताव मागे घेऊन त्यासाठी पालिकेला आता नव्याने निविदा काढाव्या लागणार आहेत.