पालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयांत 10 महिन्यात औषधे पोहचलीच नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2017

पालिका अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णालयांत 10 महिन्यात औषधे पोहचलीच नाही


स्थायी समितीत पडसाद -
दोषी अधिका-यांवर कारवाई होणार -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत मागील १० महिन्यांपासून अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे औषधांचा पुरवठा झालेला. रुग्णालयात औषधे पोहचली नसल्याने रुग्णांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टांचे बुधवारी स्थायी समितीत पडसाद उमटले. त्यावर संबंधित अधिका-यांची चौकशी करून कारवाई व्हावी व त्याबाबतची माहिती येत्या 15 दिवसांत स्थायी समितीत सादर करावी असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष रमेश कोरगांवकर यांनी प्रशासनाला दिले.

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात औषधें पुरवठा करण्यासाठी 120 कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. हा प्रस्ताव इतके महिने का रखडला याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. रुग्णालयांत औषधांचा पुरवठा करण्यात हलगर्जीपणा झाल्याचे प्रशासनानेही मान्य केले. मात्र यात दिरंगाई करणा-या अधिका-यांची चौकशी करून कारवाई व्हायला हवी, अशी जोरदार मागणी सदस्यांनी लावून धरली. मुंबई महापालिकांच्या विविध रुग्णालये व इस्पितळांना आवश्यक असणा-या टॅबलेटल, कॅप्सुल्स आदी औषधांचा पुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याबाबतची प्रक्रिया मागील वर्षभरापासून सुरु आहे. रुग्णांलयातील स्टॉक संपण्यापूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण करून औषधांचा पुरवठा होणे आवश्यक होते. मात्र तब्बल 10 महिन्यानंतर हा प्रस्ताव प्रशासनाने आणल्याने या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.

गेल्या स्थायी समितीत याबाबतचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी असे प्रस्ताव रखडवणा-या अधिका-यांची चौकशी करुन कारवाई करावी अशा सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी दिल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत तशा प्रकारचाच प्रस्ताव बुधवारी पुन्हा स्थायी समितीत प्रशासनाने मंजुरीसाठी आणला होता. यावर प्रशासन अध्यक्षांचे आदेश जुमानत नाहीत का? असा सवालही नगरसेवकांनी केला. वर्षभरापूर्वीच्या या प्रस्तावानंतर 10 महिन्यांपूर्वीच रुग्णांना औषधे मिळणे आवश्यक होते. मात्र अधिका-यांच्या हलगर्जीपणात मागील 10 महिने रुग्णांना औषधाविना ठेवण्यात आले आहे. इतका वेळ का लागला याचा खुलासा प्रशासनाने करावा अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर अधिका-यांची याबाबत दिरंगाई झाल्याचे मान्य आहे. याची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाईल. यापुढे असे प्रस्ताव आणताना नियोजन करून वेळेत प्रस्ताव आणले जाईल. दिरंगाई का झाली याबाबतची चौकशी करून त्याची माहिती येत्या सभेत दिली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त आय. एल. कुंदन यांनी स्थायी समितीत स्पष्ट केले.

Post Bottom Ad