अनधिकृत फेरीवाल्यांवर दर गुरुवारी होणार अचानक कारवाई -
मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईतील अतिक्रमणांवर महापालिकेची कारवाई सातत्याने सुरु असते. मात्र, महापालिकेच्या कार्यालयीन वेळेनंतर अनधिकृत फेरीवाल्यांचा उपद्रव सातत्याने वाढत असतो. अश्या तक्रारी पालिकेकडे आल्यावर अनधिकृत फेरीवाल्यांवर रात्री ११.३० पर्यंत कारवाई करण्याच्या दृष्टीने २४ विभागात प्रत्येकी एक याप्रमाणे २४ विशेष पथकांची स्थापना करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले होते. त्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांनी विशेष पथके स्थापनेबाबत अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत तात्काळ अंमलबजावणी करित स्थापन करण्यात आलेल्या व १९२ कर्मचा-यांचा समावेश असलेल्या २४ पथकांना रेल्वे स्थानकांच्या जवळपासच्या परिसरात दररोज प्राधान्याने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच दर गुरुवारी महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांमध्ये विभागस्तरीय पथकांचे एकत्रिकरण करुन करण्यात येणा-या परिमंडळस्तरीय महापथकाद्वारे अचानकपणे धडक कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिक्रमण निर्मूलन खात्याचे उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिली आहे.
मुंबईतील अनेक भागांमध्ये व विशेषत: रेल्वे स्टेशन जवळील परिसरात महापालिकेच्या कार्यालयीन वेळानंतर काही अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेते किंवा फेरीवाले रात्री उशीरा पदपथ व रस्त्यांवर अनधिकृत बस्तान बसवित असल्याच्या तक्रारी महापालिकेस प्राप्त झाल्या आहेत. यामुळे पादचा-यांना व वाहनचालकांना अडथळा होण्यासोबतच अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्याकडील निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर देखील प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांच्या आदेशांनुसार एक विशेष परिपत्रक नुकतेच जारी करण्यात येऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यात येत आहे. या परिपत्रकानुसार प्रत्येक पथकात ८ कामगार-कर्मचारी असणार असून सर्व २४ पथकांमध्ये एकूण १९२ कर्मचारी कर्तव्यतत्पर राहणार आहेत. या प्रत्येक पथकाला एक अतिक्रमण निर्मूलन वाहन देण्यात येणार आहे. विभागास्तरीय सहाय्यक आयुक्तांच्या सूचनेनुसार पथकातील अनुज्ञापन निरिक्षक या पथकाच्या कामाचे समन्वयन करणार असून त्यांना महापालिकेद्वारे भ्रमणध्वनी संचासह सिमकार्ड देखील देण्यात येणार आहे. अधिक सुरक्षेच्या दृष्टीने या प्रत्येक पथकासोबत पोलिस कर्मचारी असण्याबाबतही मुंबई पोलिस दलाकडे विनंती करण्यात येणार आहे. नागरी सेवा सुविधाविषयक तक्रारींसाठी असणा-या १९१६ या दूरध्वनी क्रमांकाद्वारे प्राप्त होणा-या अतिक्रमण व अनधिकृत फेरीवाल्यासंबंधीच्या तक्रारी, तसेच महापालिकेच्या संकेतस्थळाद्वारे प्राप्त होणा-या याच स्वरुपाच्या तक्रारींबाबत तात्काळ कारवाई होण्याच्या दृष्टीने या तक्रारी नव्याने गठित करण्यात आलेल्या पथकाकडे प्राधान्याने देण्यात येणार आहेत. तसेच अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे गॅस सिलिंडर किंवा रॉकेल आढळून आल्यास त्याविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्याचीही जबाबदारी या पथकांकडे सोपविण्यात आली आहे, अशीही माहिती उपायुक्त रणजीत ढाकणे यांनी दिली आहे.
गुरुवारी अनधिकृत फेरीवाल्यांवर अचानक कारवाई -
दर गुरुवारी विभागस्तरीय पथकांचे परिमंडळस्तरीय एकत्रीकरण करण्यात येऊन तयार होणा-या महापथकाद्वारे अचानक कारवाई करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ महापालिकेच्या 'परिमंडळ १' मध्ये ए, बी, सी, डी व ई या ५ विभागांमध्ये प्रत्येकी ८ याप्रमाणे एकूण ४० कर्मचारी 'स्पेशल स्कॉड' मध्ये आहेत. दर गुरुवारी हे महा-पथक परिमंडळीय उपायुक्तांच्या आदेशानुसार एकाचवेळी व एकाच ठिकाणी अचानकपणे धडक कारवाई करेल. यानुसार महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांमध्ये दर गुरुवारी धडक कारवाई करण्यात येईल.