चकालातील उद्यानाच्या भूखंडासाठी पालिका करणार २०० कोटींचा खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 September 2017

चकालातील उद्यानाच्या भूखंडासाठी पालिका करणार २०० कोटींचा खर्च


मुंबई । प्रतिनिधी -
चकाला, अंधेरी येथील १३ हजार ३२१.६७ चौरस मीटर जागेवर पालिका उद्यान उभारणार आहे. त्यासाठी हा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या जमिनीची किंमत १९४ कोटी रुपये असून पुनर्वसनाच्या खर्चासह पालिकेला हा भूखंड ताब्यात घेण्यासाठी दोनशे कोटींचा खर्च येणार आहे. सुधार समितीने याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे चाकाला येथील उद्यानाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबईतील मोकळ्या जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. या भूखंडावर मार्बलचे मोठे दुकान आहे. मात्र भूसंपादन कायद्यानुसार पालिकेला या दुकानाचे पुनर्वसन करणे अनिवार्य आहे. भूखंडाच्या पूर्वेला संरक्षक भिंत असून दक्षिण व पश्चिम बाजूला बांधीव नाला आहे. तर पूर्वेकडे एक मंदिर अस्तित्वात आहे. यामुळे हा भूखंड ताब्यात घेण्यास विलंब होत आहे. जागेवरील अतिक्रमण हटवणे आणि पुनर्वसन करण्यासाठी पालिकेला २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. या पार्श्वभूमीवर सुधार समितीत झालेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. १९९१ च्या विकास नियोजन आराखड्यात अंधेरी-घाटकोपर जोड रस्त्यावरील बिसलेरी कंपनीशेजारी असलेला हा भूखंड उद्यानासाठी आरक्षित करण्यात आला होता. हे आरक्षण रद्द होऊ नये, यासाठी २०३४ च्या विकास आराखड्यात पुन्हा उद्यानासाठीच तरतूद करण्यात आली. त्याप्रमाणे १३ हजार ३२१.६७ चौरस मीटरचा भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसेच खरेदी सूचना जमिनीच्या मालकाने पालिकेला बजावली होती. या जागेची पाहणी गेल्या आठवड्यातच करण्यात आली आहे. याठिकाणी दहा टक्के जागेवर अतिक्रमण झाल्यामुळे ही जागा तातडीने ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे मोकळी जागा उपलब्ध होणार असून मुंबईकरांसाठी उद्यान उभारणे शक्य होईल, असे सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी सांगितले.

Post Bottom Ad