मुंबई । प्रतिनिधी -
बेस्ट उपक्रमाकडून मलनिःसारण कर घेताना महापालिकेने तो दुप्पट स्वरूपात वसूल केला जात असल्याने अतिरिक्त वसूल केलेला मालमत्ता कर बेस्ट उपक्रमास परत करावा अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी मुंबई महापलिकेकडे केली आहे. मुंबई महापालिकेकडून वसूल केलेली ही अतिरिक्त रक्कम ९० कोटी असल्याने अगोदरच आर्थिक गर्तेत अडकलेल्या बेस्ट उपक्रमास मदत होईल असेही अनिल कोकीळ यांनी म्हटले आहे .
बेस्ट उपक्रमाची मुंबईत २७ बस आगारे असून विविध बस स्थानके, बेस्ट कामगार वसाहती, कार्यशाळा, विद्युत केंद्रे अशा विविध मालकीच्या जागा आहेत. या सर्व मालमत्तांचे पाणी व मालमत्ता कर मुंबई महापालिकेस वेळोवेळी भरावा लागतो. बेस्ट उपक्रम हा पालिकेचा उपक्रम असला तरी पालिकेचे सर्व कर बेस्ट उपक्रमाला भरावेच लागतात. पालिका जल देयकाबरोबरच मलनिःसारण कर समाविष्ठ करून देयके पाठवत असते, मात्र बेस्ट उपक्रमाकडून वसूल करण्यात येणारा मलनिःसारण कर वसूल करताना मुंबई महापालिकेने जल देयक आणि मलनिःसारण कर वेगवेगळ्या पद्धतीने वसूल केला. बेस्टकडून पाण्याच्या देयकाबरोबर मलनिःसारण कर घेतला गेला तसेच मालमत्ता करा बरोबर ही मलनिःसारण कर वसूल केला आहे. मलनिःसारण कर फक्त पाण्याच्या देयकाबरोबर एकदाच घेतला जात असताना बेस्ट कडून हि रक्कम दोन वेळा वसूल करण्यात आली. हि रक्कम ६० टक्य्यांपर्यंत असून तब्बल ९० कोटी रुपये जास्त बेस्टकडून वसूल करण्यात आले आहेत. सदर बाब पालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतर मुंबई महापालिकेनेही हि रक्कम दोन वेळा घेतली असल्याचे मान्य केले आहे.
आर्थिक हलाखीत सापडलेल्या बेस्ट उपक्रमाला पालिका प्रशासनाने आर्थिक मदत करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे बेस्टला कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी दर महिन्याला तारेवरची कसरत करावी लागत आहे. कधी बँकेतून कर्ज काढावे लागतवे तर कधी इतर कंपन्यांची देयके भागविण्यासाठी खर्च करावी लागते. हि अतिरिक्त रक्कम परत मिळाल्यास अगोदरच आर्थिक विवंचनेत असलेल्या बेस्ट उपक्रमास मदत होईल असे ही अनिल कोकीळ यांनी म्हटले आहे .