बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीच्या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 September 2017

बालवाडी शिक्षिका आणि मदतनीसांच्या मानधनवाढीच्या प्रस्तावाला सभागृहाची मंजुरी


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये चालविण्यात येणाऱ्या बालवाडीच्या शिक्षिका व मदतनिसांचे मानधन अत्यल्प असल्याने हे मानधन वाढवावे अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. या मागणी संदर्भात रिपब्लिकन सेनेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. पालिका प्रशासनाने मानधनवाढीचा प्रस्ताव पालिका सभागृहात मंजूर केला आहे. बालवाडीच्या शिक्षिका व मदतनिसांचे अत्यल्प असलेले मानधन वाढवावे यासाठी रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर व जेष्ठ कामगार नेते दिवाकर दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार नेते रमेश जाधव यांनी पालिकेकडे सतत पाठपुरावा केला होता. बालवाडी शिक्षिका व मदतनीस यांना देण्यात येणारी मानधनवाढ पुढील महिन्यापासून मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सन २००७ - ०८ पासून खासगी संस्थांच्या मदतीने मुंबई महापालिकेच्या ५०४ बालवाड्या सुरु आहेत. या बालवाडीत शिकवणाऱ्या शिक्षकांना सुरुवातीला प्रति महिना १५०० रुपये, तर मदतनिसांना ७५० रुपये मानधन दिले जात होते. सन २००९ - १० मध्ये या मानधनात वाढ करून शिक्षिकांचे मानधन २ हजार रुपये तर मदतनिसांचे मानधन १ हजार रुपये करण्यात आले. त्यानंतर सन २०१४-१५ मध्ये या शिक्षक व मदतनिसांचे मानधन ३ हजार व १५०० रुपये एवढे करण्यात आले होते. सध्या वाढत्या महागाईचा विचार करता देण्यात येणारे मानधन अल्प असल्यामुळे सन २०१७-१८ मध्येबालवाडीच्या शिक्षकांना ५ हजार रुपये तर मदतनिसांना ३ हजार एवढे मानधन प्रति महिना देण्याची मागणी रिपब्लिकन सेनेचे मुंबई अध्यक्ष रमेश जाधव यांनी केली होती.

मानधन वाढीसाठी रिपब्लिकन सेनेच्यावतीने आझाद मैदानात अनेक वेळा आंदोलने करण्यात आली होती. या आंदोलनामुळे पालिका प्रशासनाने वेळोवेळी बैठका घेऊन मानधनवाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी मिळाली. मात्र सभागृहात हा प्रस्ताव मंजुरी साठी सादर केला जात नसल्याने मानधनवाढ करण्यात आली नव्हती. याबाबत नुकताच रिपब्लिकन सेनेच्या वतीने पुन्हा आंदोलन करून महापौरांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान महापौरांनी ९० दिवसात मानधनवाढीचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करून मानधनवाढ करण्यात येईल असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते. त्याप्रमाणे पालिका सभागृहात मानधनवाढीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. सदर प्रस्ताव मंजूर झाल्याने बालवाडीच्या शिक्षिका आणि मदतनीस यांच्या मानधनात पुढील महिन्यापासून वाढ केली केली जाईल.

Post Bottom Ad