मुंबई | प्रतिनिधी -
महापालिकेने डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनीया, लेप्टोपायरोसिस, स्वाईन फ्लू सारख्या आजारांची व त्यावरिल उपाययोजनांची माहिती एका क्लिकवर देणायचा निर्णय घेतला आहे. त्याकरिता पालिकेने एका अॅप्लिकेशनची निर्मिती केली आहे. महापालिका रुग्णालये, दवाखाने व उपचार केंद्रे अॅप्लिकेशनला जोडली आहेत. मुंबईकरांना आपल्याला कोणते आजार जडले आहेत, याची घरबसल्या घेता येणार आहे. महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ.अविनाश सुपे यांच्या हस्ते मंगळवारी या ॲपचे लोकार्पण होणार अाहे, अशी माहिती, प्रा. डॉ. सीमा बनसोडे - गोखे यांनी दिली.
डेंग्यू, मलेरिया, एच१एन१ (स्वाईन फ्ल्यू), लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुन्या यासारख्या आजारांबाबत इंटरनेटवर माहिती उपलब्ध असू शकते. मात्र, ही माहिती शास्त्रशुद्ध असेलच असे नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या वरिष्ठ डॉक्टरांनी व संबंधित तज्ज्ञांनी या आजारांबाबत शास्त्रशुद्ध माहिती देणारे हे बहुपयोगी ॲन्ड्रॉईड ॲप तयार केले आहे. या ॲपमध्ये आजाराबद्दलची सविस्तर माहिती, आजाराचा प्रसार कसा होतो व त्याची कारणे काय? प्रसार रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी? काय करावे व काय करु नये? आदी माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर आजाराची लक्षणे कोणती,आजार झाल्यास काय काळजी घ्यावी? याबाबतचीही माहिती या ॲपमध्ये देण्यात आली आहे. आजार झाल्यास वैद्यकीय उपचारांसाठी महापालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांचेही विभागनिहाय संपर्क क्रमांक व पत्ते या ॲपद्वारे देण्यात आले आहेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या दृष्टीने कीटकनाशक खात्याचेही संपर्क क्रमांक यामार्फत उपलब्ध होणार आहेत. मान्सून रिलेटेड डायसेस (Monsoon Related Diseases) या नावाचे हे ॲन्ड्रॉईड ॲप 'गुगल प्ले स्टोअर' वर मोफत उपलब्ध करुन देण्यात आले आहे. स्मार्ट फोनवर हे अॅप सहजपणे डाऊनलोड व इन्स्टॉल करता येईल.
अतिरिक्त महापालिका आयुक्त आय. ए. कुंदन, उपायुक्त सुनिल धामणे यांच्या मार्गदर्शनानुसार महापालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वसाधारण रुग्णालयातील 'सामुदायिक औषध विभाग' व कांदिवली परिसरातील 'ठाकूर इंन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज' यांच्या पुढाकाराने आणि महापालिकेचे सार्वजनिक आरोग्य खाते व कीटकनाशक खाते यांच्या सहकार्याने हे ॲप तयार करण्यात आल्याचे प्रा. डॉ. सीमा बनसोडे - गोखे यांनी सांगितले.