अर्थसंकल्पात २६ कोटींची तरतूद -
मुंबई । प्रतिनिधी -
एकीकडे महापालिकेच्या शाळा बंद होत असून विद्यार्थी संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. असे असताना १२ नव्या शाळा बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आरक्षित भूखंडावर या शाळा बांधण्यात येणार असून याकरिता २६ कोटी ४२ कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली असल्याची माहिती विकास नियोजन खात्याचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी दिली.
मुंबई महापालिकेच्या शाळांचा दर्जा घसरत असल्याने विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत आहे. विद्यार्थी गळती रोखण्यासाठी महापालिका प्रयत्न आहे. महापालिकेच्या सुमारे १ हजार ४८ प्राथमिक तर १४७ माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळांमध्ये २ लाख ८७ हजार ९७९ तर माध्यमिक शाळांमध्ये ३५ हजार ९२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. याव्यतिरिक्त पालिकेच्या ४२२ अनुदानित शाळांमधून १ लाख ३८ हजार ४४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. अशा एकूण १ हजार ६१७ शाळांमधून सुमारे ४ लाख ६२ हजार ३४१ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर महापालिका क्षेत्रातील ६९३ खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये ३ लाख २५ हजार ४२१ विद्यार्थी आहेत. यांत १२ नव्या शाळांची भर पडणार आहे. मुंबईच्या प्रारुप विकास आराखड्यातील आरक्षित जागा मोकळ्या आहेत. ज्या आरक्षणाबाबत नियोजन समितीने कोणतेही बदल प्रस्तावित केलेले नाहीत, अशी आरक्षणे विकसित करण्यात येणार आहेत. मनपा शाळांसाठी आरक्षित असलेल्या १० तर पालिकेच्या ताब्यात असलेल्या इतर २ भूखंडावर १२ शाळा बांधण्याचे प्रस्तावित आहे. याअंतर्गत नवीन शाळांच्या बांधकामासाठी २०१७ – १८ च्या अर्थसंकल्पात २६ कोटी ४२ लाख रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती दराडे यांनी दिली.