मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहता यांनी सत्ताधारी शिवसेनेला चार हात लांब ठेवण्यास सुरुवात केली आहे. आयुक्तांकडून सर्व निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना प्राधान्य दिले जात असल्याने सत्ताधारी शिवसेनेत संतापाचे वातावरण पसरले आहे. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवक आणि महापौरांना आयुक्तांकडून वेगळी वागणूक दिली जात आहे. हतबल झालेल्या शिवसेनेने आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठरावा आणण्याच्या तयारी सुरु केली आहे. यामुळे येत्या काळात आयुक्त विरुद्ध सत्ताधा-यांमधला वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.
मुंबई महापालिकेत पालिका आयुक्त सत्ताधारी शिवसेनेला विश्वासात न घेता कारभार करीत आहेत, असा आरोप सुरू असतानाच आता चक्क पालिकेच्या काही कार्यक्रमांत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाही विचारात घेतले जात नसल्याने गेल्या महिनाभरापासून महापौर -आयुक्त यांच्या वाद सुरू आहेत. घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाची माहिती आयुक्तांकडून महापौरांना देण्यात आली नाही, सायकल ट्रँकचे सादरीकरण आयुक्तांनी महापौरांना न दाखवता थेट मुख्यमंत्र्यांना दाखवले तसेच जकात विभागातील कर्मचा-यांना इतर विभागात सामिल करुन घेतांना लॉटरी पद्धत वापरु नये असे सांगुनही लॉटरी पद्धतीचाच वापर करण्यात आला. मागील तीन महिन्यांत आयुक्तांनी सत्ताधारी व महापौरांनाही विचारात न घेतल्याने सत्ताधारी शिवसेनेमध्ये संतप्त प्रतिक्रिया आहेत. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित झालेल्या स्वच्छता हीच सेवा अभियान कार्यक्रमालाही शिवसेनेसह महापपौर महाडेश्वर यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे पालिकेत एका नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
आयुक्तांनी प्रोटोकॉल राखला पाहिजे -
मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी प्रोटोकॉल राखला पाहिजे. सर्व सदस्यांचाही सन्मान राखायला हवा. मुंबईचे महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक आहेत, त्यांचा अपमान म्हणजे मुंबईकरांचाच अपमान आहे. शिवसेना हे कदापी सहन करणार नाही. त्यामुळे आयुक्तांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून तो नियमानुसार आणला जाईल.
- राहुल शेवाळे, शिवसेना - खासदार
म्हणून कार्यक्रमाला गेलो नाही -
‘स्वच्छता हीच सेवा – पंधरवडा’ अभियानाचा शुभारंभाच्या कार्यक्रमाचा आज शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे निमंत्रण मला काल सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी फोन वरून दिले. मला निमंत्रण पत्रिका पोहचली नव्हती. पालिकेने मुख्यमंत्र्यांबरोबर बोलून कार्यक्रम ठरवून घेतला. एक दिवस आधी मला फोन वरून कळवण्यात आले म्हणून मी कार्यक्रमाला गेलो नाही. धोरणात्मक निर्णय घेताना सत्ताधारी म्हणून आयुक्तांनी आमच्याशी चर्चा करायला हवी.
- विश्वनाथ महाडेश्वर, महापौर - मुंबई