पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करा -
मुंबई । प्रतिनिधी -राज्यातील आंबेडकरी चळवळीला नक्षलवाद्यांचे बळ असल्याचा आरोप करणारे भाजप खासदार अमर साबळे यांचा भीम आर्मीने निषेध केला आहे. आंबेकरी चळवळीला बदनाम केल्या प्रकरणी साबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाईल तसेच साबळे यांना आरएसएसचा गणवेश पाठवून राज्यभर जोडे मारा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भीम आर्मीचे अध्यक्ष अशोक कांबळे, प्रवक्ते अमोल मडामे व ऍड डावरे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
मुंबई मराठी पत्रकार परिषदेत बोलताना साबळे यांच्याकडे आंबेडकरी चळवळीला नक्षलवाद्यांचे बळ असल्याचे काही पुरावे असतील तर त्यांनी ते सादर का केले नाहीत असा प्रश्न भीम आर्मीने उपस्थित केला आहे. भीम आर्मीचे संस्थापक ऍड चंद्रशेखर आझाद यांच्याविरोधात उत्तर प्रदेश सरकारकडून होत असलेली सूडबुद्धीची रासुका कारवाई रोखणे, ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करावी तसेच भाजप खासदार अमर साबळे यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ भीम आर्मी या सामाजिक संघटनेने येत्या बुधवारी १३ सप्टेंबर रोजी मुंबईसह महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
उत्तरप्रदेशातील शब्बीरपूर येथे झालेल्या सामाजिक अत्याचार प्रकरणात भीम आर्मीचे संस्थापक ऍड चंद्रशेखर आझाद कमलसिंह वालिया सहारनपुर येथील कारागृहात असून असून लवकरच त्यांची मुक्तता होणार असली तरी योगी सरकार त्यांच्यावर रासुका सारखी कारवाई करण्याचा तयारीत आहेत उत्तर प्रदेशात शैक्षणिक सह सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या मागासवर्गीयांच्या नेत्यांवर अशा प्रकारे कारवाई करून त्यांच्यावर देशद्रोहाचा ठपका ठेवू पाहत आहे. मी प्रथमतः आणि अंतत:हि भारतीयच ही शिकवण देणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श घेऊन चालणाऱ्या संघटनेच्या नेत्यांवर योगी सरकार रासुका सारखी कारवाई करीत असेल तर त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटतील असा इशारा कांबळे यांनी दिला. तसेच कर्नाटकच्या जेष्ठ परिवर्तनवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करून सत्य जगासमोर आणावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.