मुंबई / प्रतिनिधी -
मुंबईची वाहिनी असलेल्या बेस्ट उपक्रमाने साध्या व वातानुकूलित अश्या दोन्ही प्रकारच्या बसेस भाडेतत्वावर घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समिती बैठकीत फेटाळला आहे. साध्या बसेसचा प्रस्ताव उशिरा आणल्याचे तर एसी गाड्यांचा प्रस्ताव टेंडर न काढताच सादर करण्यात आल्याने बेस्ट समिती सदस्यांनी हे दोन्ही प्रस्ताव फेर विचारार्थ प्रशासनाकडे पाठवले आहेत. जुन्या एसी बसेस भंगारात काढण्याची परवानगी दिली नसताना प्रशासनाने या बस भंगारात काढल्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे प्रस्तावात उल्लेख केला आहे. असा उल्लेख केल्याने प्रशासनच धोरणात्मक निर्णय घेणार असेल तर बेस्ट समितीची गरजच काय असा प्रश्न यावेळी भाजपचे सुनील गणाचार्य यांनी उपस्थित केला आहे.
बेस्ट समिती समोर ५० साध्या बसेस खाजगी संस्थेकडून घेण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव एक वर्षाने आणल्याने तेव्हाच्या आणि आताच्या दरात फरक झाला आहे. नव्या दराप्रमाणे व सध्या लागू असलेला जीएसटी लावून किती खर्च येणार याची माहिती समितीला सादर करावी. बेस्टने स्वतः बस चालवल्यावर जेवढा खर्च होणार आहे त्यापेक्षा जास्त खर्च खाजगी बसेसमुळे होणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी व खाजगी बस चालवल्यावर होणारा छुपा खर्च किती याची सविस्तर माहिती सादर करावी. खाजगी बसेस मध्ये कंडक्टर नसल्याने याची कल्पना कर्मचारी युनियनला द्यावी अश्या मागण्या सुनील गणाचार्य, सुहास सामंत व रवी राजा या बेस्ट समिती सदस्यांनी केल्या. यावर बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट पेक्षा खाजगी बसेसला जास्त खर्च येईल असे मला वाटत नाही. जरा काही बदल करायचा असेल तर त्यात बदल करण्याची तयार असल्याचे सांगितले. तर बेस्टचे अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी खाजगी बसेवर होणार तपशीलवार सादर करण्याचे आदेश देत प्रस्ताव फेरविचारासाठी परत पाठवला.
साध्या बस प्रमाणेच ५० खाजगी मिनी एसी बसेस खाजगी संस्थेकडून घेण्याचा प्रस्तावही समिती सामोर सादर करण्यात आला होता. एसी मिनी बस मुंबईकरांना हव्यात अशी मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी केली. मात्र मिनी एसी बसेस भाड्याने घेण्याचा प्रस्ताव कोणतीही टेंडर प्रक्रिया न करता सादर करण्यात आल्याने समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. एसी बस मध्ये कंडक्टर नसल्याने या एसी बसेस फक्त आरएफआयडी कार्ड ज्यांच्याकडे आहे अश्या प्रवाश्यांसाठीच चालवणार का ? ड्रायव्हर कंडक्टरचेही काम करणार का ? याबाबत मान्यताप्राप्त युनियनची परवानगी घेतली आहे का ? खाजगी व एसी गाड्या बेस्टच्या आगारामध्ये उभ्या राहणार आहेत, खाजगी कंपन्यांचे कर्मचारीही आगारात ये जा करणार असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण राहणार असे प्रश्न सुनील गणाचार्य, सुहास सामंत व रवी राजा यांनी उपस्थित केले. यावर सदस्यांच्या भावना लक्षात घेत अध्यक्ष कोकीळ यांनी एसी बसेसचाही प्रस्ताव फेरविचारासाठी प्रशासनाकडे परत पाठवला.