मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत २९ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीत रेल्वे व इतर वाहतूक सेवा कोलमडली असताना बेस्ट परिवहन सेवेने मात्र पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप इच्छितस्थळी पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली. या परिस्थितीत बेस्टच्या परिवहन आणि विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांनी ज्या सेवाभावी वृत्तीने मुंबईकरांची सेवा केली याचा विचार करून त्यांचे कौतुक कारण्यासाठी त्यांना दिवाळी बोनसची भेट द्यावी अशी मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी बेस्ट समितीत केली. मात्र महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याने बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पावसाच्या पाण्यात बेस्टच्या बसेस चालवल्यामुळे ६० गाड्या नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. त्यांच्या दुरुस्तीसाठी ५५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याचबरोबर या गाड्या रस्तयावर धावत नसल्याने बेस्टचा सुमारे १ कोटी रुपयांचा महसूल बुडाला आहे. अतिवृष्टीच्या काळात पोलिसांनी बजावलेल्या कामगिरीच्या बदल्यात शासनाकडून पोलिसांना ६ कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. त्याच पद्धतीने बेस्टलाही पालिकेने आर्थिक सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत जेष्ठ सदस्य सुनिल गणाचार्य यांनी व्यक्त केले. बोनसच्या मागणीला पाठिंबा देताना विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी बेस्ट कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. मात्र बेस्टची आर्थिक परिस्थिती पाहता वेळेवर वेतन मिळणे अडचणीचे असताना प्रशासनाने बोनस कसे देणार हे स्पष्ट करावे अशी मागणी केली. संप काळात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे झालेल्या चर्चेदरम्यान १० तारखेच्या आत वेतन आणि बेस्टचा अर्थसंकल्प पालिकेच्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली होती. त्यानुसार बेस्ट समितीत सदर प्रस्ताव मंजूर करून तो पालिकेकडे पाठवून एक महिना झाला तरी त्यावर निर्णय झालेला नाही. सदर तातडीचा प्रस्ताव मंजूर करण्यासाठी महापौरांशी चर्चा करावी असे सांगत प्रस्ताव मंजूर न होणे हा उद्धव ठाकरे यांचा अवमान असल्याचे रवी राजा यांनी सांगितले. पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे यासाठी पालिका आयुक्तांनाही वस्तुस्थिती समजवून सांगण्यासाठी प्रयत्न करावेत अशी सूचना रवी राजा यांनी केली. यावर बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी पालिकेच्या भूमिकेबद्दल आपल्याला काही माहिती नाही. बेस्ट उपक्रमाची आर्थिक अडचण असल्याचे स्पष्ट करत अप्रत्यक्ष रित्या बेस्ट कर्मचारयांना बोनस देण्यास असमर्थता व्यक्त केली.