पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण बैठकीवर सर्व पक्षीयांचा बहिष्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2017

पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण बैठकीवर सर्व पक्षीयांचा बहिष्कार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आयुक्तांकडून मनमानी कारभार सुरु आहे. कायदे धाब्यावर बसवले जात आहेत. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीचे अध्यक्ष आयुक्त आहेत. शुक्रवारच्या बैठकीला अध्यक्ष असलेले आयुक्त गैरहजर राहणार होते. मात्र त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्तांना पाठवणार असल्याची माहिती सदस्यांना देण्यात आली नसल्याने सर्व पक्षीय सदस्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती सभागृह नेते यशवंत जाधव यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेच्या वैधानिक समितीत वृक्ष प्राधिकरण हि सुद्धा एक समिती आहे. या समितीचे कामकाज स्वतः आयुक्त चालवतात. आयुक्तांनी सर्व नियम व कायदे धाब्यावर बसवत कामकाज सुरु ठेवले आहे. यामुळे वृक्ष प्राधिकरण समितीमधील सदस्यांनी विरोध करूनही सर्व प्रस्ताव मंजूर होत होते. शुक्रवारी संपन्न झालेल्या बैठकीत विविध ठिकाणच्या प्रकल्पात बाधित होणारी १२० झाडे तोडण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या बैठकीला स्वतः आयुक्त हजार राहणार नव्हते. यामुळे त्यांनी त्यांच्या जागी अतिरिक्त आयुक्तांना बैठकीला उपस्थित राहण्याचे सांगितले. मात्र त्या बाबतची माहिती सदस्यांना देण्यात आली नव्हती. बैठकी दरम्यान सदस्यांना हा प्रकार समजताच सर्व पक्षीय सदस्यांनी या बैठकीतून सभात्याग केला. शुक्रवारच्या बैठकीत एम पूर्व विभागातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या जागेवरील २, एल विभागातील प्रीमियर नाल्यावरील ७०, एम पूर्व विभागातील कॅलिको प्लॉट येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या जागेवरील १५, एम पश्चिम विभागातील जुन्या घाटकोपर पम्पिंग स्टेशनच्या जागेवरील ३३ झाडांच्या कापण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले असल्याची माहिती जाधव यांनी दिली.

प्राधिकरणावर एकही एनजीओचा सदस्य नाही - वृक्ष प्राधिकरणावर एनजीओचे १३ सदस्य नियुक्त केले जातात. यासाठी सदर संस्था एनजीओ राज्य सरकारच्या वन विभागाकडे नोंद असणे आवश्यक आहे असा नियम आहे. या नियमांकडे दुर्लक्ष करत आता पर्यंत राजकीय वजन वापरून या नियुक्त्या केल्या जात होत्या. मात्र सभागृह नेते यशवंत जाधव यांनी राज्य सरकारच्या वन विभागाकडे पत्रव्यवहार करून किती संस्था नोंद आहेत याची माहिती मागवली होती. याबाबत माहिती देताना एकही संस्था वन विभागाकडे नोंद नसल्याचे कळविण्यात आले आहे. यामुळे पालिकेला १३ रिक्त जागांवर कोणत्याही एनजीओच्या सदस्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही.

Post Bottom Ad