बेस्टच्या २५९ वातानुकूलित बसगाड्या भंगारात काढल्या जाणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 September 2017

बेस्टच्या २५९ वातानुकूलित बसगाड्या भंगारात काढल्या जाणार

मुंबई । प्रतिनिधी -
आर्थिक घाट्यात असलेल्या बेस्टच्या ताफ्यात काही वर्षांपूर्वी वातानुकूलित बस विकत घेण्यात आल्या होत्या. वातानुकूलीत बस गाड्यांमुळे बेस्टचा घाटा आणखी वाढल्याने या २५९ वातानुकूलित बसगाड्या बंद करण्यात आल्या असून आता या बसगाड्या भंगारात काढल्या जाणार आहेत. बेस्टला आर्थिक खाईत ढकलण्यात मोठा वाटा असलेल्या या बसगाड्या गेल्या काही वर्षांपासून जागेवरच उभ्या आहेत. या सर्व गाड्यांचे आयुष्य संपले असल्यामुळे त्या जशा आहेत त्याच अवस्थेत भंगारात काढाव्यात असा प्रस्ताव बेस्ट प्रशासनाने तयार करून समितीच्या मंजूरीसाठी पाठवला आहे.

बेस्ट उपक्रमाने २००९मध्ये वातानुकूलित बस खरेदी केल्या. खाजगी वाहनांतून फिरणाºया प्रवासी वर्गाला खेचण्यासाठी बेस्टने ही सेवा सुरू केली. मात्र सुरुवातीपासूनच या बस सेवेला अल्प प्रतिसाद मिळाला. उत्पन्नापेक्षा खर्चच जास्त होऊ लागल्याने वातानुकूलित बस बेस्टसाठी डोईजड ठरू लागल्या. तरीही नगरसेवकांचा दबाव आणि प्रतिष्ठेखातर या बस सुरू राहिल्या. यामुळे बेस्टची आर्थिक तूट दरवर्षी वाढत गेली. या एका बसची किंमत ५५ ते ६५ लाख रुपये होती. मात्र या बस नादुरुस्त होणे, वारंवार बंद पडणे असे प्रकार घडू लागले. या बसच्या इंजिनमध्ये बिघाड होऊन गाडीला आग लागण्याच्या घटनाही घडल्या. अखेर बेस्टला टाळे लागण्याची वेळ आल्याने बेस्टने तयार केलेल्या कृती आराखड्यानुसार सर्वप्रथम वातानुकूलित बस बंद करण्यात आल्या. त्यानुसार वातानुकूलित बस एप्रिल २०१७पासून चालवणे बंद करण्यात आले आहे. वातानुकूलित गाड्यांचे आयुर्मान १० वर्षे असते. या सर्व गाड्यांचे आयुर्मान ७ वर्षांहून अधिक आहे. या गाड्या अ‍ॅल्युमिनियमच्या नसून लोखंडी असल्यामुळे मुंबईच्या दमट हवामानात त्यांना गंज चढला आहे. त्यामुळे या गाड्या दुरुस्त केल्याशिवाय चालवता येणार नाही. मात्र सांगाड्याच्या दुरुस्तीसाठी अतिरिक्त खर्च करणे आता बेस्ट उपक्रमाला परवडणारे नाही, असेही प्रशासनाने म्हटले आहे

Post Bottom Ad