मुंबई, दि. १४: महाराष्ट्राच्या विकासात सहकारी बँकांचे अतुलनीय योगदान असून बँकिंग क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर आहे. ज्या भागांमध्ये बँकिंग क्षेत्राच्या नेटवर्कचा विस्तार झाला आहे, तेथे विकास अधिक असून राज्याच्या सर्व भागात हा विस्तार होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात सारस्वत बँकेच्या शतकमहोत्सवी वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या प्रसंगी केंद्रीय वाहतूक, नदीविकास आणि गंगा पुनरूज्जीवन मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू, भारतीय रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक सुदर्शन सेन, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाचा सर्वात अगोदर वापर करणारी ही बँक असून एका समूहासाठी तयार झालेल्या बँकेच्या कक्षा रुंदावून अनेक भागात ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे काम आज करत आहे. सहकारी बँकांचे राज्याच्या विकासात अतुलनीय योगदान आहे. विकासामध्ये कॅपिटलचे महत्त्व खूप असते. बँकांजवळ आज पैसा आहे, त्यांना चांगले ग्राहक हवे आहेत. गरिबांनी बँकांना बुडवले नाही. भारत हा तरुणांचा देश म्हणून आज जगभरात ओळखला जातो. त्यांना समाजासाठी काम करण्याची मोठी संधी आहे. त्याचबरोबर बँकिंग आणि वित्तीय संस्था यांचे महत्त्व मोठे आहे. नीती आयोगाने काही दिवसांपूर्वी अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात महाराष्ट्रात ५ लाख ९६ हजार कोटीचे मोठे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. त्या माध्यमातून उत्तम पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यामंत्र्यांनी यावेळी सांगितले.