मुंबई - देशात जवळपास ५३ टक्के बालकांचे कोणत्या ना कोणत्या प्रकारे लैंगिक शोषण होते. हे रोखण्यासाठी आपल्या करुणेच्या सीमा फक्त आपल्या घरापुरत्याच मर्यादित न ठेवता प्रत्येकाने करुणेचा परीघ वाढविणे गरजेचे आहे. कोणत्याही बालकाचे शोषण हे आपल्याच बालकाचे शोषण आहे, असे समजून या समस्येचा सामना आपल्याला करावा लागेल. या भावनेसह बालकांचे लैंगिक व इतर प्रकारचे शोषण रोखण्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असे आवाहन बाल हक्कासाठी कार्य करणारे नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी आज येथे केले.
सत्यार्थी यांनी ‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ याविषयी भारत यात्रा काढली आहे. या यात्रेचे आज महाराष्ट्र राज्य बालहक्क आयोगामार्फत स्वागत करण्यात आले. यासाठी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे बाल लैंगिक शोषणाबाबत संवेदना जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्यार्थी बोलत होते.