मानधनवाढी बाबत शासन सकारात्मक - अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सेवेवर तातडीने हजर व्हावे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2017

मानधनवाढी बाबत शासन सकारात्मक - अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सेवेवर तातडीने हजर व्हावे


मुंबई, दि. २१ : अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनवाढीच्या मागणीबाबत शासन सकारात्मक असून सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी तातडीने कामावर हजर व्हावे, असे आवाहन महिला-बालविकास विभागाच्या सचिव विनिता वेद-सिंगल यांनी केले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शासनाने आरोग्य विभागाच्या आशा वर्कर तसेच ग्राम समित्यांकडून पोषण आहाराचे काम सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाली आहे. पोषण आहाराचे काम अत्यावश्यक असल्याने ते कोणत्याही परिस्थितीत बंद ठेवता येत नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सेवेवर तातडीने हजर व्हावे. त्यांच्या मानधनवाढीची कार्यवाही शासनस्तरावर सुरु असून कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

कुपोषणामुळे बालमृत्यू नाही -
मागच्या आठवड्यात अंगणवाडी सेविकांच्या संपाने कुपोषणामुळे बालमृत्यू झाल्याच्या बातम्या विविध माध्यमात प्रसिध्द झाल्या होत्या. पण याबाबत माहिती घेतली असता हे बालमृत्यू कुपोषणामुळे नसून इतर विविध कारणांनी झाल्याचे निदर्शनास आले आहे. ठाणे जिल्ह्यात जन्मत:च मुलाचे वजन कमी व न्युमोनिया झाल्यामुळे एका मुलाचा मृत्यू झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात ५ मुलांचे मृत्यू झाले असून अकाली प्रसूती ( १ मूल ), ब्राँकायटीस ( १ मूल),रेस्पिरेटरी डीस्ट्रेस विथ फॉरेन बॉडी (१ मूल ), कॉजेनायटिल ॲनामोली इंटेस्टाईन ( १ मूल) ,बर्थ ॲसफिसीया ( १ मूल) या कारणामुळे हे मृत्यू झाले आहेत. पालघर जिल्ह्यात न्युमोनिया (२मुले), अेआरडीएस (२ मुले), काँजेनायटिल ॲनामोली इंटेस्टाईन (२ मुले), सेप्टीसिनिया (१मूल), सर्पदंश (२ मुले), बर्थ ॲसफिसीया (१ मूल), रेस्पिरेटरी इंन्फेक्शन (१ मूल) अशा विविध कारणांमुळे ११ मुलांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये ० ते १ वयोगटातील १४ तर १ ते ६ वयोगटातील ५ अशा १९ मुलांचा मृत्यू विविध प्रकारच्या आजाराने झाला आहे, अशी माहिती श्रीमती सिंगल यांनी दिली.

आशा वर्करमार्फत ५,८६१ अंगणवाड्यांमध्ये पोषण आहार वाटप -
पोषण आहार वाटपाचे काम आशा वर्कर यांच्यामार्फत करण्याचा निर्णय काल शासनाने घेतला. त्यानुसार आज राज्यातील नागरी प्रकल्प वगळून ५ हजार ८६१ अंगणवाड्यांमध्ये आशा वर्करमार्फत पोषण आहाराचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कमलाकर फंड यांनी दिली. ६६४ अंगणवाडी सेविका, ३२ मिनी अंगणवाडी सेविका व २५३ मदतनीस संपावरून पुन्हा कामावर हजर झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

औरंगाबाद विभागात १ हजार २१५, अमरावती विभागात ७३५, नागपूर विभागात ८५, कोकण विभागात २ हजार ६७८, नाशिक विभागात ६२, पुणे विभागात १ हजार ९७ अंगणवाड्यांमध्ये आज आशा वर्करमार्फत पोषण आहार वाटप करण्यात आला. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये घटस्थापनेनिमित्त आज सुटी होती. या जिल्ह्यांमध्येही उद्यापासून पोषण आहार पुरवठा सुरु करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Post Bottom Ad