न्यायालयाच्या दट्ट्यानंतर पालिका आयुक्तांनी दिले डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2017

न्यायालयाच्या दट्ट्यानंतर पालिका आयुक्तांनी दिले डॉ. अमरापूरकर यांच्या मृत्यूच्या चौकशीचे आदेश


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसात बेपत्ता झालेले बॉम्बे रुग्णालयातील प्रसिद्ध डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृतदेह गुरुवारी सकाळी वरळी कोळीवाडा समुद्रात सापडला होता. अमरापूरकर हे अतिवृष्टीत वाहून गेले होते. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला नोटीस बजावली आहे. येत्या दोन आठवड्यात याप्रकरणी म्हणणं मांडण्याचे आदेशही उच्च न्यायालयाने महापालिकेला आज दिले. न्यायालयाच्या दट्ट्या नंतर पालिका आयुक्तांनी या प्रकरणी एका चौकशी समितीची स्थापना केली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

२९ ऑगस्टला मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पाणी साचले होते. या पाण्यामधून बॉम्बे हॉस्पिटलचे गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट डॉ. दीपक अमरापूरकर घरी जायला निघाले होते. दुपारी 4.30 वाजता ते बेपत्ता झाले. पालिकेने पाण्याचा निचरा होण्यासाठी उघडलेल्या मॅनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. मॅनहोल्समध्ये पडल्याने अमरापूरकर यांचा मृत्यू झाला असून त्याला मुंबई महानगरपालिकाच जबाबदार आहे, असा आरोप करून या प्रकरणी भादंवि कलम ३०४ (अ) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच कोणत्याही स्वयंसेवी संस्थेला ५० लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुंबई महापालिकेला द्या, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.

पालिकेच्या चुकीमुळे देशातले नामांकित गॅस्ट्रो अँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून ओळख असलेल्या एका प्रसिद्ध डॉक्टरचा जीव गेल्याने फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनवाई दरम्यान न्यायालयाने अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला तसेच अन्य प्रतिवादींना नोटीस बजावली आहे. याबाबत दोन आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. शिवाय अमरापूरकर कुटुंबीयांना वाटत असेल तर ते महापालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करू शकतात. तशी त्यांना मुभा आहे, असेही न्यायालयानं स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या निर्देशानंतर पालिका आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमली आहे. या समितीला १५ दिवसात आपला अहवाल पालिका आयुक्तांना सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad