मुंबई । प्रतिनिधी -
बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले पण आजही प्रत्यक्षात कोणतेही काम सुरु झाले नाही. 23 महिन्याच्या विलंबामुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाच्या खर्चात 166 कोटींची वाढ झाली आहे. सद्या सुमारे 591 कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येणार असून मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएटस् यांस आतापर्यंत 3.44 कोटी दिल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस एमएमआरडीए प्रशासनाने दिली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी एमएमआरडीए प्रशासनाने कडे इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची माहिती मागितली होती. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील इंदू मिल येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबडेकर स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते त्यावेळी राज्य शासनाने 425 कोटी खर्च येणार असल्याची माहिती दिली होती. एमएमआरडीए प्रशासनाने अनिल गलगली यांस कळविले की इंदू मिल येथील स्मारकाच्या जमिनीचे क्षेत्रफळ 48414.83 चौरस मीटर असून सदर जागेचा ताबा एमएमआरडीएने शासनाच्या वतीने 25 मार्च 2017 रोजी घेतला आहे.स्मारकाच्या बांधकामासाठी 14 एप्रिल 2017 रोजी रचना व बांधणे या तत्वावर निविदा मागविण्यात आल्या आहेत. निविदेसंबंधी कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्मारकाचे काम सुरु होईल. यासाठी सुमारे 591 कोटी रुपये इतका अंदाजित खर्च येईल. या कामासाठी शासनाने आर्किटेक्ट मेसर्स शशी प्रभू अँड असोसिएटस् यांची नियुक्ती केली आहे. यांस आतापर्यंत 3.44 कोटी इतकी रक्कम देण्यात आली आहे. या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 ऑक्टोबर 2015 रोजी करण्यात आले आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता फक्त निवडणूक लक्षात घेता भूमिपूजन झाल्याने आजही स्मारकाचे काम प्रत्यक्षात सुरुच झाले नाही, अशी खंत व्यक्त करत अनिल गलगली म्हणाले की सरकारच्या अनियोजनाचा आर्थिक फटका 166 कोटींचा आहे. भविष्यात अश्या चुका टाळण्यासाठी खबरदारी केंद्र आणि राज्य सरकारने घ्यावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे.