मुंबई । प्रतिनिधी
व्यसनाच्या दुष्परिणामांवर भाष्य करणारा "व्यसन" हा चित्रपट शुक्रवारी १ सप्टेंबरपासून प्रदर्शित झाला असून व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या चित्रपटाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यसन चित्रपटाचे मुक्ता (पनवेल), के के (कामोठे) या चित्रपट गृहातील शो हाऊस फुल्ल झाले असून असाच प्रतिसाद महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही मिळत आहे.
"व्यसन" चित्रपटाची निर्मिती जितेंद्र मुंडकर यांनी केली असून दिग्दर्शन रुपेश मुंडकर यांनी केले आहे. जितेंद्र मुंडकर यांनी व्यसनाचे दुष्परिणाम जवळून पहिले आहेत. त्यावरून त्यांना कथा सुचली आणि चित्रपट बनविण्याचा निर्णय घेतला. असंख्य अडचणीतून हा चित्रपट पूर्ण करण्यात आला आहे. चित्रपटाची कथा निर्माते जितेंद्र मुंडकर यांची असून पटकथा व संवाद अमोल सोनावले, शंकर शेडगे व जितेंद्र मुंडकर यांनी लिहिले आहे. निर्माते हे कोळी समाजाचे असून त्यांनी आपला पिढीजात असलेला मासेमारीचा व्यवसाय सांभाळून चित्रपटाची निर्मिती केली आहे. मुळात लहानपणापासून कलेची आवड असलेल्या जितेंद्र मुंडकर यांचा पनवेलच्या कामोठे येथे रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे. कोळीगीते आणि बऱ्याच अल्बमची त्यांनी निर्मिती केली आहे. चित्रपट करताना अनुभव पाठीशी नसल्याने अनेक बरे वाईट अनुभवायला मिळाले. तरीही जिद्दीने हा चित्रपट पूर्ण केला आहे.
दिगदर्शक रुपेश यांचा हा पहिलाच प्रयत्न असला तरी शॉर्टफिल्म्स बनविण्याचा अनुभव कामी आला आहे. अमोल सोनावले, डॉ. रवी तेरकर, शरद पवार, न्हावकर यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार कबीर, कुणाल करण यांनी संगीत दिले आहे. संकलन अविनाश सिंग, ध्वनी विशाल भोईर, कला श्रेयस मुंडकर, नृत्ये नॉडी रसाळ, व उमेश कोळी, साहस दृशे कुमार विरा यांची आहेत. या चित्रपटात जयराज नायर, वृषाली हाटाळकर, अमित शिंगटे, जितेंद्र मुंडकर, अरविंद वाघमारे, प्रदीप पटवर्धन, वाजीद अन्सारी, शंकर शेडगे व बाल कलाकार नितेश डोके यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. १ सप्टेंबर पासून मुक्ता (पनवेल), के के (कामोठे), सहकार (चेंबूर), कैलाश (वाडा), अपोलो (पुणे), भाई भाई (आजरा), सिध्दीनाथ (आटपाडी), प्लॅटिनम (जुन्नर) या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे.