मुंबईत २९ ऑगस्ट रोजी पडलेल्या मुसळधार पावसात साचलेल्या पाण्यात मॅनहोलमध्ये पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. अमरापूरकर यांच्या मृत्यूला सर्वस्वी मुंबई महापालिका जबाबदार आहे, असे प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. मुंबई काँग्रेस आयोजित श्रद्धांजली सभेदरम्यान निरूपम बोलत होते.
आपले काम संपवून घरी जात असताना, सर्वत्र पाणी तुंबल्यामुळे चालत घरी जात असताना गटाराच्या मेनहोलमध्ये पडून त्यांचा मृत्यू झाला. ३६ तासानंतर त्यांचा मृतदेह वरळी येथील पंपिंग स्टेशनजवळ मिळाला. मुंबई महानगरपालिकेला याची शरम वाटायला हवी. एकतर रस्ते चांगले बनवत नाहीत, गटारे तुंबलेली असतात, त्यांवर झाकणेही नसतात आणि त्यात माणसे पडतात. खूप शरमेची गोष्ट आहे जेव्हा मनपा आयुक्त म्हणाले की, गटारांना झाकणे लावली होती. पण ती चोरीला गेली. साधारणपणे जेव्हा गटारावर झाकण नसते, तेव्हा एक लाल कपडा, एखादी खुण किंवा फलक लावलेला असतो. माझ्या मते मुंबई मनपावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा असे निरुपम म्हणाले.
२९ ऑगस्टची ही घटना होते न होते, तोच भेंडीबाजार येथील हुसैनी इमारत कोसळली आणि या इमारतीमध्ये राहणारी कित्येक कुटुंबे ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अशा जवळपास १६ हजार इमारती मुंबईत आहेत. ज्या जर्जर झालेल्या आहेत. या इमारतींची दुरुस्ती होत नाही. विकासक आणि बिल्डर्स या इमारतींची दुरुस्ती करण्यास इच्छित नाहीत. कारण इमारत दुरुस्त झाली तर भाडेकरू निघून जाणार नाहीत. इमारत पडावी, त्यामधील माणसे दबून मरावीत असे विकासकांचे कारस्थान आहे. त्यांच्या या कारस्थानामध्ये पालिका प्रशासन, म्हाडाचे लोक आणि दुरुस्ती विभाग सामील आहेत. त्यांच्यावरही कारवाई व्हायला हवी असे निरुपम म्हणाले.
याप्रसंगी डॉ. दीपक अमरापूरकर, हुसैनी इमारत पडून मेलेले नागरिक, मुंबई काँग्रेसचे दिवंगत सरचिटणीस विनोद शेखर आणि मुंबई काँग्रेसच्या कायदा विभागाचे माजी अध्यक्ष विजय सुत्राळे यांच्या दुखद निधनाबद्दल मुंबई काँग्रेसतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, आमदार भाई जगताप, माजी आमदार मधु चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे महासचिव संदेश कोंडविलकर, भूषण पाटील, काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.