मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही - राज ठाकरें - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 September 2017

मुंबईत बुलेट ट्रेनची एकही विट रचू देणार नाही - राज ठाकरें


मुंबई । प्रतिनिधी -
शहरातील रेल्वे स्थानकांचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत मुंबईत बुलेट ट्रेन प्रकल्पाची एकही विट रचू देणार नाही, अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली आहे. बुलेट ट्रेनचे जे काही बांधकाम करायचे असेल ते मोदींनी आपल्या गुजरातमध्ये करावे. मात्र, मुंबईत बळजबरीने बुलेट ट्रेनचे काम करायचा प्रयत्न केल्यास त्याला ‘मनसे’कडून चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगत राज यांनी थेट मोदींना आव्हान दिले आहे. 

काल एलफिन्स्टन स्थानकात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर बोलण्यासाठी राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी रेल्वे प्रशासन आणि भाजप सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईतील रेल्वे स्थानकांच्या दुर्दशेसाठी रेल्वे प्रशासन आणि सरकारच जबाबदार आहे. काँग्रेस जाऊन भाजपचे सरकार आले तरी यामध्ये काहीच फरक पडलेला नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच या सगळ्याचा जाब विचारण्यासाठी ५ ऑक्टोबरला पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट येथील मुख्यालयावर ‘मनसे’कडून मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. राज ठाकरे स्वत: या मोर्चाचे नेतृत्त्व करणार आहेत. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन मुंबईकरांनी आपल्या मनातील राग व्यक्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Post Bottom Ad