मुंबई । प्रतिनिधी -
केंद्र सरकारने १ जुलै पासून देशभरात एक कर लागू करण्यासाठी जीएसटीची अंमलबजावणी सुरु केली. यामुळे महागाई कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत असताना जीएसटीमुळे दरवाढ झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. त्यातच रेल्वे बोर्डाने केलेल्या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने आपल्या अखत्यारीत येणाऱ्या स्थानकांमधील खाद्यपदार्थाच्या सर्व स्टॉलवर जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्तावही पश्चिम रेल्वेने तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या १५ दिवसांत करण्यात येणार असून, मध्य रेल्वेवरील स्थानकातील खाद्यपदार्थाच्या सर्व स्टॉलवरही लवकरच अंमलबजावणी करण्याचा विचार करण्यात येत आहे. यामुळे येत्या काही दिवसात रेल्वे प्रवाशांना रेल्वे स्टॉलवरील खाद्यपदार्थासाठी जादा पैसे खर्च करावे लागणार आहेत.
भाजपाचे सरकार केंद्रात आल्या नंतर प्लॅटफॉर्म तिकिटाच्या दरात वाढ करून हे तिकीट १० रुपये करण्यात आले. तसेच रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या आणि लोकलच्या प्रथम श्रेणीतील तिकिटावर असलेला ४.५ टक्के सेवा कर जीएसटीमुळे जुलै २०१७ मध्ये वाढवून ५ टक्के करण्यात आला. त्यामुळे तिकिटाच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे प्रवाशांच्या खिशाला कात्री लागलेली आहे. प्रवासी या दरवाढीमुळे आधीच त्रस्त असताना रेल्वे स्थानकांत असणाऱ्या स्टॉलमधील खाद्यपदार्थावर १२ टक्के जीएसटी लागू केला आहे. ज्या खाद्यपदार्थावर याआधी सेवा कर होता त्यात जीएसटीचा समावेश केला. त्यामुळे अशा खाद्यपदार्थाच्या किमती वाढल्या नाहीत; परंतु ज्या खाद्यपदार्थावर जीएसटी लागू नव्हता, त्यांच्यावरही जीएसटी लागू झाल्याने काही खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ झाली आहे. पश्चिम रेल्वेकडून सर्व स्थानकांतील परवानाधारक स्टॉल्समधील खाद्यपदार्थावर जीएसटी लागू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार खाद्यपदार्थाच्या किमतीत वाढ होणार असली तरी जीएसटी १२ टक्के लागू करायचा की ५ टक्के यावर मात्र रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये दुमत आहे. यामुळे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी खाद्यपदार्थांवर किती टक्के जीएसटी लागू करतात यावर पदार्थांच्या किमतीत वाढ होणार आहे.