शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल संपावर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2017

शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी महाराष्ट्र सुरक्षा बल संपावर


मुंबई । प्रतिनिधी -
पोलिसांच्या अपुऱ्या संख्याबळामुळे महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान तैनात करण्यात आले. शासकीय सेवेत सामावून घ्यावे व पगारवाढ करावी या मागणीसाठी हजारो सुरक्षा बलाचे जवान संपावर गेले आहेत. घाटकोपर येथील मेट्रो स्थानकावर शेकडो जवानांनी आंदोलन केले. यामुळे मेट्रो, एअरपोर्ट, टोल नाका, टाटा हॉस्पिटल, मोनो रेल, मुंबई महापालिकेची रुग्णालये येथील सुरक्षेला फटका बसला आहे.

महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान मुंबई मेट्रोच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत. या सुरक्षा रक्षकांसाठी मेट्रोकडून मंडळाला २४ हजार पगार दिला जात असताना मंडळाकडून मात्र सुरक्षा रक्षकांना १२ हजार पगार देण्यात येतो. या जवानांची नियुक्ती करताना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र अद्याप त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यात आलेले नाही. याच दरम्यान सुरक्षा बाळाला दिलेले कंत्राट रद्द केल्याने हजारो जवानांचे काम गेले आहे. यामुळे सुरक्षा बलाच्या जवानांना शासकीय सेवेत सामावून घ्यावे व पगारवाढ करावी या मागणीसाठी मंगळवारी सकाळपासून काम बंद आंदोलन करण्यात आले. सुरक्षा बलाचे कर्मचारी संपावर गेल्यामुळे घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या तिकीट काऊन्टर आणि तपासणी काऊन्टरवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. याठिकाणी हाऊस किपिंगच्या कर्मचाऱ्यांकडून प्रवाश्यांची तपासणी करण्यात येत होती. मेट्रो, एअरपोर्ट, टोल नाका, टाटा हॉस्पिटल, मोनो रेल याचप्रमाणे राज्यातील अनेक देवस्थानांना तसेच मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना ही कंपनी सुरक्षा पुरवत आहे. बुधवारी हे सर्व जवान पुण्याला जमणार असून त्याठिकाणाहून मुंबईकडे पायी चालत येणार आहेत. मुंबईत आल्यावर आपल्या मागण्यांसाठी १ ऑक्टोबरला मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

रुग्णालयांवर संपाचा परिणाम नाही -
महाराष्ट्र सुरक्षा बल कंपनीचे सुरक्षारक्षक संपावर गेले आहेत. रुग्णालयाच्या सुरक्षेवर मात्र त्याचा कोणताही परिणाम जाणवत नाही. महापालिकेचे सुरक्षारक्षक अगदी व्यवस्थित सुरक्षा देत आहेत. मात्र बुधवारी सुरक्षा व्यवस्थेवर कितीसा प्रभाव पडतो हे कळेल, अशी पालिका वैद्यकिय संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.

Post Bottom Ad