अफवेमुळे एलफिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2017

अफवेमुळे एलफिन्स्टन स्टेशनवर चेंगराचेंगरीत २२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी

दुर्घटनेच्या चौकशीचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश -
मुंबई । प्रतिनिधी - पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन आणि मध्य रेल्वेच्या परळ रेल्वे स्टेशनला जोडणाऱ्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरी झाल्याने ३९ जण जखमी झाले असून २२ जण ठार झाले आहेत. पावसामुळे पेंटाग्राफमध्ये शॉर्ट सर्किट होऊन मोठा आवाज झाल्याने पूल कोसळत असल्याची तासेक्सच पुलाला शॉक लागत असल्याची अफवा पसरल्याने प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन हि दुर्घटना घडल्याची चर्चा आहे. दरम्यान, पूल सुरक्षित आहे. पूल पडल्याच्या किंवा शॉर्ट सर्किटच्या कुठल्याही अफवेवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात येत आहे. तर या दुर्घटनेच्या चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत.

पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील दादर आणि परळ या स्थानकातून प्रवासी मोठ्या संख्येने लोकल बदलून प्रवास करत असतात. शुक्रवारी सकाळी कामावर जाण्याच्या घाईत प्रवासी असतानाच एल्फिस्टन आणि परेल या स्थानकांना जोडणाऱ्या पुलावर प्रचंड गर्दी होती. याच दरम्यान या ठिकाणी पाऊस पडत असल्याने लोकलच्या पेंटाग्राफचा स्फोट झाला. पेंटाग्राफचा स्फोट होताना झालेल्या आवाजाने प्रवाश्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले. याचवेळी पुल कोसळत असल्याची व पुलाला शॉक लागत असल्याची अफवा पसरली. यामुळे प्रवासी आणखीनच घाबरल्याने पुलावर अफरातफर माजली. काही प्रवाश्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी पुलावरून उड्या मारल्या. पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक प्रवासी पुलावर पडले. त्यांच्यावरून इतर प्रवासी आपला जीव वाचवण्यासाठी पळत होते. यामुळे पुलावर प्रवाश्यांच्या खच पडला होता.

जखमी प्रवाश्याना उपचारासाठी जवळच्या पालिकेच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ३९ जण जखमी असून २२ जणांचा मृत्यू झाला आहे. २२ मृतांपैकी १७ जणांची ओळख पटली असून ५ जणांची अद्याप ओळख पटलेली नाही. २२ मृतांमध्ये १४ पुरुष असून ८ महिला प्रवासी आहेत. तर जखमी झलेल्या ३९ जणांपैकी ३० पुरुष आणि ९ महिलांचा समावेश आहे तर मृत्यू पावलेल्या २२ जणांपैकी १३ परुष, ८ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश -
एल्फिस्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, गृहसचिव सुधीर श्रीवास्तव आणि मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांनी केली घटनास्थळाला भेट दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही या दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. आज केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल नव्या लोकलच्या उदघाटनासाठी मुंबईत येणार होते. दुर्घटनेबाबत माहिती मिळताच गोयल यांनी मुंबईत येताच नियोजित कार्यक्रम रद्द करत घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर केईएम रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. व या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

५ लाखांची आर्थिक मदत - 
एलफिन्स्टन रोड (प्रभादेवी) आणि परळ स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलावर आज झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत आणि जखमींवरील उपचारांचा सर्व खर्च शासनाच्यावतीने करण्यात येणार असून या दुर्घटनेची राज्य सरकार आणि रेल्वे विभागाद्वारे सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ही दुर्घटना अतिशय धक्कादायक आणि दु:खद असून मृतांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन सर्व जखमींना योग्य उपचार तात्काळ मिळवून देण्यासह परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश राज्याचे मुख्य सचिव तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याशीदेखील या दुर्घटनेबाबत चर्चा केली असून या घटनेची राज्य शासन व रेल्वे विभागामार्फत सखोल चौकशी करण्यात येणार आहे. या दुर्घटनेसाठी दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक सर्व सहकार्य रेल्वे प्रशासनाला करण्यात येईल.

रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा द्यावा - 
एल्फिस्टन स्टेशनच्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रवाश्यांना भेटण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल गेले असता तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी गोयल यांच्या विरोधात घोषणा दिल्या. गोयल यांच्या समोरच रेल्वे मंत्री हाय हाय, बुलेट ट्रेन रद्द करा, रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अश्या घोषणा देण्यात आल्या.

रक्तदानासाठी मुंबईकर धावला - 
एल्फिस्टन पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या प्रवाश्यांवर पालिकेच्या केईएम रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या उपचारादरम्यान ए पाॅझिटीव्ह, बी पाॅझिटीव्ह आणि एबी पाॅझिटीव्ह या तीन गटांतील रक्त अपुरे पडल्याने उपचारात अडचणी आल्या होत्या. मुंबई पोलिसांनी रक्ताची आवश्यकता असल्याचे ट्विट करताच हे ट्विट मुंबईकरांनी सोशल मिडीयावर शेअर केल्याने. केईएम रुग्णालयात रक्तदान करण्यासाठी मुंबईकर धावून आले. यामुळे रक्ताचा आता मुबलक साठा असल्याचे रुग्णालयाकडून कळविण्यात आले आहे. मुंबईकरांनी दिलेल्या प्रतिसादामुळे रक्ताची चिंता मिटल्याने मुंबई पोलिसांनी मुंबईकरांचे आभार मानले आहेत.

मृतांची नावे - 
१ मुकेश मिश्रा
२ शुभलता शेट्टी
३ सुजाता शेट्टी
४ सचिन कदम
५ मयुरेश हळदणकर
६ अंकुश जैसवाल
७ ज्योतिबा चव्हाण
८ सुरेश जैसवाल
९ टेरेसा फर्नांडिस
१० रोहित परब
११ अॅलेक्स कुरिया
१२ हिलोनी देढिया
१३ चंदन गणेश सिंग
१४ मोहम्मद शकील
१५ श्रद्धा वरपे
१६ मिना वरुणकर
१७ मसूद आलम
(५ जणांची ओळख अद्याप झालेली नाही)

Post Bottom Ad