मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईतील धोकदायक इमारती रिकाम्या करण्याची कारवाई प्रभावीपणे करण्यासाठी सर्व विभागांनी संबंधित इमारतीचे पदाधिकारी, रहिवाशी यांची बैठक घेऊन त्यांचे प्रबोधन करावे. त्यातील धोके त्यांना समजावून सांगावे तसेच जनप्रबोधनासाठी पालिकेच्या वतीने करण्यात आलेले पोस्टर्सही या इमारतींमध्ये लावण्यात यावे. त्यासाठी सर्व विभागांनी आपल्या भागात विशेष मोहीम राबवावी असे आदेश पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहेत.
महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. एरवी दरमहा पहिल्या शनिवारी होणारी आढावा बैठक सुट्टीमुळे आज घेण्यात आली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाट, उपायुक्त (आयुक्त कार्यालय) रमेश पवार यांच्यासह महापालिकेचे सर्व संबंधित उपायुक्त, सहाय्यक आयुक्त व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते. या बैठकीत मुंबईत एकूण ६४२ एवढ्या धोकादायक इमारती असून यापैकी २२ इमारती तोडल्या आहेत. तर १२० इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. उर्वरित ५०० इमारतींपैकी १५४ इमारतींबाबत न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. तर ३६ इमारतीं विषयी तांत्रिक सल्लागार समितीकडे प्रकरणे आहेत. तसेच १५४ इमारतींबाबत वीज व पाणी जोडणी खंडित करण्यात आली असून १५६ इमारतींबाबत कार्यवाही सुरु असल्याची माहिती देण्यात आली.
कचऱ्याचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष्य - २ ऑक्टोबर पासून मोठ्याप्रमाणात कचरा निर्माण करणा-या गृहनिर्माण व व्यवसायिक आस्थापनांचा कचरा उचलला जाणार नाही. कच-याची विल्हेवाट कशी लावावी, याबाबत सर्व विभागात मार्गदर्शनासाठी 'हेल्प डेस्क' सुरु करण्याचे तसेच प्रत्येक विभागात टीम तयार करुन त्यांनी अशा सोसायट्यांना भेटी द्याव्यात व आवश्यक मार्गदर्शन करावे असे निर्देश महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीत दिले. त्याशिवाय मोठ्या झोपडपट्ट्यांमध्ये निर्माण होणारा कचरा त्याच भागात प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावण्यासाठीही प्रयत्न सुरु करण्याचे आदेश, आयुक्तांनी आजच्या बैठकी दरम्यान दिले.
सध्या मुंबईत ५ हजार ३०४ अशा सोसायट्या / आस्थापना असून आतापर्यंत २३४ सोसायट्या / आस्थापनांनी त्यांच्या पातळीवर प्रक्रिया करुन कच-याची विल्हेवाट लावण्यास सुरुवात केली आहे.
दोन वर्षापूर्वी ९ हजार ५०० मेट्रीक टन असलेला कचरा सुमारे ७ हजार ३०० टन एवढा खाली आणण्यात महापालिकेला यश आले आहे. ऑक्टोबर २०१७ पर्यंत ६ हजार ५०० टन इतका खाली आणण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे, असेही महापालिका आयुक्तांनी आजच्या बैठकीत सांगितले.
उघड्यावर अन्न शिजवल्या प्रकरणी २२ गुन्हे दाखल -गेल्या बैठकीत रस्त्यावर अन्न शिजवणा-यां फेरीवाल्यांवर कारवाई करुन पोलिसात गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात दिले होते. याबाबत १२४ तक्रारी पोलिसांत दाखल करण्यात आल्या असून २२ प्रकरणात पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय भारत व हिंदुस्तान पेट्रोलियम कंपन्यांना पालिकेच्या वतीने कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे. यापैकी हिंदुस्तान पेट्रोलियमने आपल्या वितरकांना या अनुषंगाने सूचना जारी केल्या आहेत.
अतिवृष्टीशी आधारित कृती आराखडा -या बैठकी दरम्यान अतिवृष्टीशी संबंधीत विविध मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यानुसार ज्या ज्या ठिकाणी अधिक प्रमाणात पाणी साचले होते, त्या ठिकाणांचा व परिस्थितीचा सविस्तर अभ्यास करुन त्यावर आधारित कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच आवश्यक तेथे सर्वेक्षण करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. ही जबाबदारी अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल व संचालक (अभियांत्रिकी सेवा व प्रकल्प) विनोद चिठोरे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
रश्मी लोखंडे 'ऑफीसर ऑफ द मंथ' -२९ ऑगस्ट २०१७ रोजीच्या अतिवृष्टीमुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली होती. या दरम्यान आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे अत्यंत तत्परतेने व सक्षमपणे विविध जबाबदा-या पार पाडण्यात आल्या. तसेच अतिवृष्टीशी संबंधित असणा-या सर्वच यंत्रणांशी सुयोग्य समन्वय साधून अपेक्षित कार्ये वेळेत पूर्ण करण्यात आली. या सर्व बाबी ज्यांनी आपल्या सहका-यांसह पूर्ण केल्या त्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या उपप्रमुख अधिकारी रश्मी (संगिता) राजेंद्र लोखंडे यांचा 'सप्टेंबर २०१७' या महिन्यासाठी 'महिन्याचे मानकरी' अर्थात 'ऑफीसर ऑफ द मंथ' या बहुमानाने गौरविण्यात आले आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या हस्ते प्रमाणपत्र व शाल देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.