मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत इमारत पडण्याच्या घटना ताज्या असतानाच घाटकोपर येथील दामाजी सदन हि इमारत एका बाजूला कलंडल्याने पालिकेने खाली केली आहे. दरम्यान या इमारतीमधील रहिवाश्याना पालिकेने किंवा विकासकाने पर्यायी घरे दिलेली नाहीत. हि इमारत पालिकेने बिल्डरच्या सांगण्यावरून खाली केल्याचा आरोप येथील रहिवाश्यांनी केला आहे.
घाटकोपर रायगड चौक येथील दामजी सदन हि ४० ते ५० वर्षे जुनी असलेली इमारत बुधवारी सायंकाळी एका बाजूला कलंडली असतयाची माहिती पालिकेला सायंकाळी मिळाली. चार मजली असलेली इमारतीच्या एका बाजूचा तळमजल्यापासूनचा बाल्कनीचा भाग झुकलेला होता. हि इमारत पागडी सिस्टमची होती. पालिकेला इमारत एका बाजूला झुकली असल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल व पोलिसांच्या सहाय्याने इमारत खाली करण्यात आली. बुधवारी रात्री रहिवाश्याना इमारत खाली करण्यास सांगण्यात आल्याने रहिवाश्यांनी रात्री जायचे कुठे असा प्रश्न रहिवाश्यांकडून उपस्थित केला जात होता.
गुरुवारी सकाळी इमारतीचा धोकादायक असलेला भाग पालिकेने पाडला. यानंतरही रहिवाश्याना इमारत राहण्यास योग्य नसल्याने रहिवाश्यांना आपले सामान घेऊन इतर ठिकाणी भाड्याच्या घरामध्ये तर काहींना नातेवाईकांकडे जावे लागले आहे. या इमारतीचे मालक व बिल्डर, विकासक रसिक पारेख यांनी रहिवाश्यांचे पुनर्वसन न केल्याने त्यांच्यावर पंत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती रहिवाश्यांनी दिली.
दरम्यान इमारत झुकल्याची माहिती पालिकेला देणाऱ्याने रहिवाश्याना इमारत झुकल्याचे का सांगितले नाही ? इमारत खाली करताना रहिवाश्याना इतर पर्यायी घर देण्यात येणार नाही असे पालिकेने स्पष्ठ केले असले तरी पालिकेने किंवा बिल्डरने कोणत्याही प्रकारच्या तातपुरत्या स्वरूपातले शेल्टर का उभारले नाहीत ? असे प्रश्न रहिवाश्यांकडून उपस्थित केले जात असून बिल्डरच्या इशाऱ्यावर पालिकेने इमारत खाली केल्याचा आरोप केला जात आहे.