मुंबई - राज्यातील नवबौध्द हे बौद्ध समाजाचेच असल्याने या नवबौद्धांना अल्पसंख्यांकाचा दर्जा द्यावा अशी मागणी गेले कित्तेक वर्षे बौद्ध संघटनांकडून करण्यात येत होती. बौद्ध समाजाच्या मागणीची दखल घेत अखेर २८ सप्टेंबरला नवबौद्धांना अल्पसंख्यांक दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसा शासन निर्णय अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे यांच्या स्वाक्षरीने काढण्यात आला आहे. यामुळे आता नवबौध्द अल्पसंख्यांकांकासाठी असलेल्या शासकीय योजनांचे लाभ घेण्यास कायदेशीररित्या पात्र ठरणार आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली नागपूर येथे त्यांच्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. त्यानंतर अनुसूचित जातीत समावेश असलेल्या अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार १९६० पूर्वीच्या बौद्धांना अल्पसंख्यांकांच्या दर्जा देण्यात आला होता. मात्र नव्याने धर्मांतरित झालेल्या लोकांचा नवबौद्ध असा उल्लेख करण्यात येत होता. धर्मांतरित नवबौद्धांना १९६० पर्यंत अनुसूचित जातीच्या सवलतींचा लाभ देण्यात येत नव्हता. तसेच त्यांचा अल्पसंख्यांकांमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, १९६० च्या शासकीय अभिलेखात आंबेडकरी अनुयायांचा नवबौद्ध असा उल्लेख करण्यात आल्यानंतर त्यांना अनुसूचित जातींच्या सवलती देण्यात आल्या. बौद्ध धम्मातील कोणत्याही व्यक्तीला १९९० पर्यंत केंद्रातील अनुसूचित जातींच्या सवलती मिळत नव्हत्या. तत्कालीन व्ही.पी. सिंग सरकारने अनुसूचित जातीमध्ये नवबौद्ध समाजाची नोंद घातली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असलेल्या धर्मांतरीत बौद्धांना अनुसूचित जातीचे लाभ देण्यासाठी नवबौद्ध या शब्दाचा वापर करण्यात आला. धर्माने ते खऱ्या अर्थाने बौद्धच आहेत. म्हणून महाराष्ट्रातील नवबौद्धांना कायदेशीररित्या बौद्ध म्हणून समजणे अनिवार्य आहे. तसेच त्यांना बौद्ध अल्पसंख्याक म्हणून सन १९५६ पासून कायदेशीर दर्जा प्राप्त झालेला आहे. त्यामुळे अल्पसंख्याक समुदायासाठी राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ घेण्यास कायदेशीर रित्या पात्र ठरत असल्याचे शासनाच्या अध्यादेशात म्हटले आहे. या आदेशामुळे मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, पारशी, ज्यु आणि जैन धर्म समुदायानंतर नवबौद्ध समुदायाला अल्पसंख्यांक दर्जा मिळाला असून नवबौध्दही आता अल्पसंख्याकांसाठी असलेल्या शासकीय योजनांचे लाभ घेण्यास कायदेशीररित्या पात्र ठरणार आहेत.