मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई शहर हे जागतिक दर्जाचे शहर असल्याने नेहमीच अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असते. मुंबई महापालिकाही याला अपवाद नाही. माहापालिकेतही सुरक्षा व्यवस्था चोख राखण्यासाठी तसेच सुरक्षा रक्षक व अधिकारी यांच्यामध्ये सूचनांची देवाण घेवाण व्यवस्थितपणे होण्यासाठी महापालिका 70 वॉकी टॉकी संच भाडेतत्वावर घेणार आहे. यासाठी महापालिका 80 लाख 24 हजार 590 रुपये खर्च करणार आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीत हा प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.
मुंबई शहरास समाजविघातक शक्तींकडून होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन तसेच रुग्णालये व प्रसूतीगृहे येथे सुरक्षा व्यवस्था चौख ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार सुरक्षा खात्याने सुरक्षा व्यवस्था चोख ठेऊ असे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. महापालिकेच्या कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख राखण्यासाठी सुरक्षा रक्षक अधिकारी यांच्यामध्ये कार्यवाहीच्या सूचनांची देवाण- घेवाण व्यवस्थित होणे आवश्यक आहे. 200 वॉकी टॉकी खरेदी करून पुरवण्यासाठी सार्वजनिक जाहिरातीव्दारे निविदा मागवण्यात आली होती. सदर निविदेकरीता दोघांनी प्रतिसाद दिला. मात्र त्यांच्याकडे वॉकी टॉकी खरेदी करून पुरवण्यासाठी केंद्र सरकारच्या वायरलेस प्लॅनिंग एन्ड कोऑर्डिनेटिंग विंग यांच्याकडून देण्य़ात येणारे आवश्यक परवानापत्र नसल्यामुळे सदर निविदा रद्द करण्यात आली व त्यावेळेस केईएम रुग्णालय, एल टी एम जी रुग्णालय व नायर रुग्णालय आदी ठिकाणी मे. लिंकवेल टिलिकॉम सर्विसेस यांच्याकडून वॉकी टॉकी भाडे तत्वावर घेण्यात आली, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
सिमकार्ड दिल्यास सिमकार्डसाठी ब-याच ठिकाणी रेंज उपलब्ध होत नसल्याचे लक्षात आले. तसेच मोबाईल वरून एका वेळेस एका व्यक्तीशीच संपर्क साधता येतो. तसेच सुरक्षा व्यवस्था तीन पाळीत असल्यामुळे व सुरक्षा रक्षकांच्या काही ठराविक कालावधीनंतर बदल्या होत असतात. तसेच कर्मचा-यांनी हॅन्डसेट सुस्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे सीमकार्ड दिल्यास अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. याचा विचार करून वॉकी टॉकी घेण्याचा निर्णय़ झाला असल्याचे महापालिकेतून सांगण्यात आले.