बुऱ्हाणी ट्रस्ट, तवक्कलवर कारवाई करा -
मुंबई । प्रतिनिधी -भेंडी बाजारमधील हुसैनी इमारतीमध्ये तळमजल्यावर तवक्कल या मिठाईवाल्याने पिलर तोडल्यानेच इमारत कोसळल्याचा आरोप शिवसेनेचे पालिकेतील सभागृह नेते यशवंत जाधव यांनी महासभेत केला आहे. या इमारतीला २०११ मध्ये धोकादायक ठरवून पालिकेने नोटीस दिली होती. भेंडीबाजार परिसरातील पुनर्विकासाचे काम करणार्या बुर्हाणी ट्रस्टने धोकादायक इमारतीची जागा मिठाईवाल्याला भाड्याने दिलीच कशी असा सवालही जाधव यांनी केला आहे. या दुर्घटनेत ३३ निरपराध्यांच्या मृत्यूला जबाबदार असणार्या बुर्हाणी ट्रस्ट व पिलर तोडणार्या मिठाईवाल्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी जाधव यांनी केली.
भेंडी बाजारमधील १३३ वर्षांची हुसैनी इमारत ३१ ऑगस्ट रोजी कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण जखमी झाले. या घटनेचे पडसाद पालिकेच्या महासभेत उमटले. पालिकेच्या क्षेत्रात असणार्या धोकादायक इमारतींना नोटीसा पाठवल्यानंतर त्या रिकामी केल्या आहेत की नाही हे पाहण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव म्हणाले. भेंडी बाजार परिसरातील २८८ धोकादायक इमारतींच्या पुनर्विकाचे कंत्राट दिलेल्या सैफी बुर्हाणी अपलिफ्टमेंट ट्रस्टने या धोकादायक इमारतीत दुकाने, नर्सरीसाठी भाड्याने जागा दिलीच कशी असा सवालही त्यांनी केला. प्रशासकीय अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ए, बी, सी, डी, ई आणि एफ वॉर्डमध्ये सर्वाधिक धोकादायक इमारती असल्याचे ते म्हणाले.
मुंबईत तब्बल १६ हजार धोकादायक इमारती धोकादायक आहेत. या इमारतीं धोकादायक असल्याची पालिका फक्त नोटीस देते. त्यानंतर या इमारती खाली केल्या कि नाहीत याचा पाठपुरावा केला जात नाही. यामुळे पालिकेने १६ हजार धोकादायक इमारतींसाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा असे आवाहन विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केले. या रहिवाशांना पुनर्विकासाबाबत ठोस आश्वासन आणि खात्री मिळत नसल्याने ते आपले घर सोडत नाहीत. त्यामुळेच अशा घटना घडत असल्याचा आरोपही त्यांनी केला. धोकादायक इमारतींचा पुनर्विकास निर्धारित वेळेत होण्यासाठी ‘गाईडलाइन’ तयार करावी अशी मागणी शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी केली. समाजवादीचे गटनेते रईस शेख यांनी दुर्घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी अशी मागणी केली. तर काँग्रेसचे नगरसेवक जावेज जुनेजा यांनी धोकादायक इमारतींमधील रहिवाश्यांसाठी बीपीटीच्या जागेवर संक्रमण शिबीर बनवावीत अशी सूचना केली.
बाबू गेणू दुर्घटनाग्रस्त अद्याप वाऱ्यावर -
सप्टेंबर २०१३ मध्ये डॉकयार्ड येथील बाबू गेनू इमारत कोसळून ६२ जणांचा बळी गेला. अनेकजण जखमी झाले. यावेळी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र ही मदत अद्यापही मिळाली नसल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांनी सांगितले.