मुंबई । प्रतिनिधी -
श्री गणेश विसर्जनासाठी महापालिकेतर्फे गिरगांव चौपाटीसह अन्य ६९ विसर्जनस्थळी जय्यत पूर्वतयारी करण्यात आली आहे. ११ दिवसांपैकी शेवटच्या दिवशी महापालिकेचे ९ हजार अधिकारी / कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सर्व विसर्जनस्थळी सर्व व्यवस्था केली असून मुंबईकर गणेशभक्त नागरिकांनी सर्वतोपरी काळजी घेऊन श्रीगणरायाला भावपूर्ण निरोप द्यावा, असे आवाहनही महापौर विश्वनाथ महाडेश्वर व महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी केले आहे.
श्री गणेश विसर्जनासाठी येणारे वाहन भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नयेत व मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, याकरीता चौपाटीच्या किनाऱयावर ८४० जाड लोखंडी फळ्या (स्टील प्लेटस्) ठेवण्यात येतात. परंतु, यावर्षी विविध गणेश मंडळांच्या विनंतीनुसार अतिरिक्त लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी ५० जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ६०७ जीव सुरक्षारक्षकांसह जर्मन तराफे, ८१ बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी २०१ निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. कलशामधील निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर व डंपर असे एकूण १९२ वाहने सर्व विसर्जनस्थळी ठेवण्यात आलेली आहेत. महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱयांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी एका नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच इतर ५८ निरिक्षण कक्ष व ४८ निरिक्षण मनोरे तयार करण्यात आली. अन्य ठिकाणी ८७ स्वागत कक्ष तयार ठेवण्यात आली आहेत. आरोग्य विभागाकडून ७४ प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
‘बेस्ट’ द्वारे खांबांवर उंच जागी लावण्यासाठी सुमारे १९९१ दिवे (फ्लड लॅन्टर्न) व १३०६ शोधदीप (सर्च लाईट) ची व्यवस्था, नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या ११८ शौचालयांची (मोबाईल टॉयलेट्स) व्यवस्थाही करण्यात आली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहिनासहीत मनुष्यबळाची व्यवस्था तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहीत ६० सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. श्री गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोईग वाहने, क्रेन्स, जे. सी. बी. मशिन्स, बुलडोझर इत्यादी यंत्रसामुग्रीदेखील विसर्जनाच्या वेळेपर्यंत तैनात करण्यात आली आहे. श्री गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात करताना समुद्रास येणारी भरती आणि ओहोटी लक्षात घेऊन समुद्रात जावे, पालिकेने ३२ कृत्रिम तलाव, ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळे या सेवा-सुविधांमुळे अनंत चतुर्दशीदिनीही कृत्रिम तलावांत जास्तीत-जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असे आवाहन महापौर आणि महापालिका आयुक्तांनी केली आहे.
नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करताना घ्यावयाची काळजी -
१. खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नका.
२. भरती व ओहोटीच्या वेळांची माहिती समुद्रकिनाऱयांवर लावण्यात आली आहे ती समजून घ्या.
३. गणेशमूर्ती विसर्जनाकरीता शक्यतो महापालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.
४. अंधार असणाऱया ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाकरीता जाण्याचा प्रयत्न करु नका.
५. मोठय़ा गणेशमूर्तींबरोबर प्रत्यक्ष विसर्जनाकरीता समुद्रात जाणाऱया मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिरगणती करुन जावे.
६. महापालिकेने पोहण्याकरीता निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करु नका.
७. गणेशमूर्तींचे विसर्जन करताना शक्यतो तराफ्यांचा, प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करा.
८. समुद्रात / तलावात कुणी बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्वरित त्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना / पोलिसांना / जीवरक्षकांना द्या.
९. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
१०. अफवांवर विश्वास ठेवू नका व अफवा पसरवू नका.
खबरदारीच्या सूचना -
१. भाविकांनी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात / विसर्जनस्थळी जाण्यापासून मज्जाव करावा.
२. गणेशभक्तांनी मूर्तींचे विसर्जन करतेवेळी पाण्यात गमबुट घालावेत.
३. महापालिकेने केलेल्या विसर्जनाच्या व्यवस्थेचा म्हणजे विनामुल्य तराफ्यांचा किंवा बोटींचा वापर करावा.
४. मद्यप्राश्ान करुन समुद्रकिनाऱयावर विसर्जनस्थळी जाऊ नये कारण अशा व्यक्तिवर मस्त्सदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.
एखाद्या भाविकास मत्स्यदंश झाल्यास -
१. समुद्रातून बाहेर आल्यावर आपणांस मत्स्यदंश झाल्याचे जाणवल्यास तात्काळ सदर जागा स्वच्छ पाण्याने धुवावी अथवा उपलब्ध असल्यास त्यावर बर्फ लावणे.
२. माशांचा दंश्ा झालेल्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असेल तर जखमेचे ठिकाण स्वच्छ कपड्याने किंवा हाताने दाबून धरावे, जेणेकरुन जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही.
३. मत्स्यदंश झालेल्या भाविकांनी घाबरुन न जाता महानगरपालिकेच्या समुद्रकिनाऱयावरील प्रथमोपचार केंद्रात जाऊन विनामुल्य वैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्यावी.
बस गाड्यांमध्ये कपात -
मंगळवारी गणपती विसर्जन असल्याने मुंबई शहर व उपनगरांतील अनेक रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बेस्ट बस मार्गाचे परावर्तन करण्यात येते. या दिवशी बस गाड्यांमधून प्रवास करणा-या प्रवाशांची संख्याही कमी असल्याने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी उपक्रमाच्या बसगाड्यामध्ये कपात केली जाणार आहे. या दिवशी दुपारी २.३० वाजल्यानंतर एकूण ३४०४ बसगाड्यांपैकी १६८७ बसगाड्यांचे प्रवर्तन करण्यात येणार आहेत, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली.