मुंबई | प्रतिनिधी -
२९ ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्याने मुंबईतील नदी - नाल्याशेजारील व सखल भागात पाणी साचल्याने मुंबईकरांचे हाल झाले. ही वस्तूस्थिती लक्षात घेता, राज्य सरकारने पूरस्थितीत बाधित झालेल्याना पूरग्रस्त घोषीत करुन नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक व सुधार समिती अध्यक्ष बाळा नर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.
२९ अॉगस्ट रोजीच्या पडलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांना २६ जुलैच्या पुनरावृत्ती केली. कमी वेळेत रेकॉर्डब्रेक पाऊस झाला. समुद्राला याच दरम्यान भरती असल्याने मुंबईत पाणी साचून पूरस्थिती निर्माण झाली. मुंबईकरांचे यामुळे प्रचंड हाल व नुकसान झाले. राज्य सरकारने या पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेणे, गरजेचे असताना अद्याप दखल घेतलेली नाही. प्रभाग क्रमांक ७७ मधील गोणीनगर, इंदिरानगर, आझादनगर, न्यू इंदिरानगर, मेघवाडी हनुमान चौक, शामनगर दुबे इस्टेट आदी तसेच मजास नाल्या काठच्या जवळील ९० टक्के घरांमध्ये पुराचे पाणी शिरले. परिणामी घरगुती साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शहर व उपनगरातील झोपडपट्ट्या, सखल भागातील वसाहती, मिठी नदी, दहिसर नदी, पोयसर नदी, मजास नाला, मोगरा नाला, वालभट नदी आदी छोट्या मोठ्या नदी नाल्यांच्या शेजारील झोपड्यांमध्ये पाणी शिरले. राज्य सरकारने या घटनेचे सर्वेक्षण करण्याची गरज होती, राज्य सरकारने याकडे अद्याप दुर्लक्ष केले. सदर बाब नैसर्गिक आपत्ती असून सरकारने याचे सर्वेक्षण करावे, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या क्षेत्राला पूरग्रस्त भाग म्हणून घोषित करुन तातडीची मदत जाहीर करावी, अशी मागणी बाळा नर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.