मानधनाची मागणी पूर्ण झाल्याने आकाशवाणी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 September 2017

मानधनाची मागणी पूर्ण झाल्याने आकाशवाणी कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन मागे


मुंबई - प्रलंबित मानधनाची मागणी पूर्ण झाल्याने आकाशवाणी मुंबईच्या वृत्तविभागातील हंगामी कर्मचार्यांनी आपले कामबंद आंदोलन मागे घेण्याची घोषणा केली आहे. तशा आशयाचे निवेदन, कर्मचाऱ्यानी आज वृत्ताविभागाचे प्रमुख आणि संयुक्त संचालक एम झेड आलम यांना दिले. 

प्रलंबित मानधनाच्या एकमेव मागणीसाठी या कर्मचाऱ्यानी गेल्या २३ ऑगस्टपासून लेखणीबंद आंदोलन पुकारले होते. सुमारे चार वर्षांपासून हंगामी कर्मचाऱ्याना त्यांचे मानधन वेळेत मिळत नव्हते. हे मानधन मिळण्यास कधी तीन कधी पाच पाच महिने विलंब होत असे. यासाठी कर्मचाऱ्यांनी सतत पत्रव्यवहार आणि तक्रारी करून पाठपुरावा केला. दिल्लीच्या अधिकाऱ्यांशीही संपर्क साधला. मात्र प्रत्येकवेळी केवळ काही काळासाठी हा प्रश्न निकाली काढला जात असे. त्यातच आकाशवाणीत गेल्या ५ जूनपासून तीन नवी राष्ट्रीय मराठी बातमीपत्रे सुरु झालीत. त्यामुळे कामाचा ताण वाढला. कामाच्या वेळाही वाढल्या आणि त्यात बदलही झाला. मात्र सर्व कर्मचाऱ्यांनी ही जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारत उत्तम रीतीने पार पाडली. असे असतानाही कर्मचाऱ्यांना वेळेत मानधन मिळाले नाही, त्याविषयी विचारणा केली असता दिल्लीहून निधी येत नाही असे एकमेव उत्तर मिळत असे. हे सगळे सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यावर प्रशासनाला जागे करण्यासाठी या कर्मचाऱ्यानी नाईलाजाने लेखणीबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.

या आंदोलनाची दखल घेत मुंबई आणि दिल्ली कार्यालयाने निधी पाठवत दहा दिवसात कर्मचाऱ्यांचे बहुतांश प्रलंबित मानधन त्यांच्या खात्यात जमा केले. उर्वरित रक्कमही लवकरच खात्यात जमा केली जाईल, असे आश्वासनही मिळाले आहे. या आंदोलनाच्या काळात दिल्ली कार्यालयाच्या अतिरिक्त महासंचालक आणि प्रादेशिक वृत्ताविभागांच्या पदाधिकारी वसुधा गुप्ता यांच्याशी कर्मचाऱ्यांची चर्चा झाली. त्यांनी अतिशय संवेदनशीलतेने कर्मचाऱ्यांची व्यथा समजून घेतली. न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असेही त्यांनी सांगितले. मात्र, या आंदोलनाचा परिणाम म्हणून, २३ ऑगस्टचे राष्ट्रीय बातमीपत्र गेले नाही त्याविषयी त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी हे बातमीपत्र न गेल्याबद्दल हंगामी कर्मचाऱ्यांचा जबाबदारीचा भाग म्हणून, सर्व कर्मचाऱ्यांनी लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे. श्रोते आणि आकाशवाणीशी असलेले ऋणानुबंध लक्षात घेत कर्मचाऱ्यानी, बातमीपत्र न गेल्याबद्दल २४ ऑगस्टलाच दिलगिरी प्रसिद्ध केली होती, हे ही त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच याबद्दल सौम्य शिक्षा स्वीकारण्याची तयारीही दर्शवली होती. आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्र दिल्लीला पाठवावे, कार्यालय त्याविषयी निर्णय घेईल, अशी सूचना, त्यावेळी, गुप्ता यांनी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार, कर्मचाऱ्यानी त्वरित हे पत्र पाठवले होते. त्यात मानधनाची मुख्य मागणी पूर्ण झाल्यामुळे आंदोलन मागे घेण्याची तयारीही दर्शवली होती. तसेच आंदोलनाचा निर्णय सामूहिक असल्याने कोणा एका कर्मचाऱ्याविरोधात कारवाई करू नये अशी विनंतीही केली होती. हे पत्र पाठवून आठ दिवस झाले असून अद्याप दिल्लीकडून कारवाईविषयक काहीच लेखी आदेश आला नसल्याने, दिल्ली कार्यालयाने कर्मचाऱ्याच्या प्रश्नाचा सहृदयतेने आणि सर्व बाजूनी विचार केला असावा, असा विश्वास कर्मचाऱ्यानी व्यक्त केला. यापुढेही मानधन वेळेवर मिळेल आणि आकाशवाणीवर अवलंबून असलेल्या अनेक गरीब कर्मचाऱ्याचा सहानुभूतीने विचार केला जाईल, अशी आशाही या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

आंदोलनाच्या यशस्वीतेनंतर, आकाशवाणी कार्यालयाचे आभार व्यक्त करत हे आंदोलन मागे घेत असल्याचे कर्मचाऱ्यानी सांगितले. आकाशवाणीच्या प्रक्रियेप्रमाणे, सर्व कर्मचाऱ्यानी आपली उपलब्धता कार्यालयाला कळवली असून लवकरच रुजु होऊन, नव्या दमाने काम करण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Post Bottom Ad