आपत्कालीन व्यवस्थापनचा बोजवारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2017

आपत्कालीन व्यवस्थापनचा बोजवारा


मुंबईत २६ जुलै २००५ ला महापूर आला होता. या दिवशी आकाश फाडून मुसळधार पाऊस पडल्याने मुंबई जलमय झाली होती. मुंबईत पाहावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते. या दिवशी शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. अनेकांच्या घरातील, दुकानातील, व्यवसायातील उपयोगातील सामानाचे नुकसान झाले होते. २६ जुलैच्या दुसऱ्या दिवशी सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले होते. अनेक ठिकाणी पाण्याबरोबर वाहत आलेले मृतदेह दिसत होते. याला आता १२ वर्षे झाली आहेत. परंतू १२ वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेमधून आजही राज्य सरकार, मुंबई महापालिका व पालिकेच्या आपत्कालीन विभागाने काही बोध घेतलेला दिसत नाही. २९ ऑगस्ट २०१७ ला असाच मुसळधार पाऊस पडला. या दिवशी अनेक लोकांना पालिकेच्या आपत्कालीन विभाग व अग्निशमन दल यांच्या संपर्कात राहून अनेकांना रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असताना बाहेर काढताना पत्रकारांना आपत्कालीन व्यवस्थापनात काही त्रुटी आढळल्या आहेत. यात सुधारणा केल्यास मुंबईकर नागरिकांना वेळेवर निर्णय घेऊन वाचवता येऊ शकते.

२६ जुलै २००५ ला एका तासात ९४४ मिमी इतका पाऊस पडल्याने मुंबई जलमय झाली होती. त्यांनतर तब्बल १२ वर्षांनी मुंबईत २९ ऑगस्ट २०१७ ला ३२० मीमी इतका पाऊस पडून मुंबई जलमय झाली आणि भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ठप्प पडली होती. मुंबई जलमय झाल्याने रस्त्यावरील वाहतूक, रेल्वे, हवाई वाहतूक ठप्प झाली होती. मुंबईत जोरदार पाऊस पडेल अशी माहिती आधीच हवामान खात्याने दिली होती. यामुळे महापालिका आयुक्तांनी आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यासाठी नेव्ही पासून एनडीआरएफच्या टीम तैनात ठेवल्या होत्या असे सांगण्यात आले.

२९ ऑगस्टला मुंबई शहर विभागात सकाळपासूनच धो धो पाऊस पडत असल्याने उपनगरातून निघालेल्या लाखो चाकरमान्यांना मुंबईत काय होत आहे याची साधी कल्पनाही नव्हती. दुपारपर्यंत मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले. रेल्वेच्या रूळांवरही पाणी साचले. कुर्ला चुनाभट्टी पासून मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या लोकल गाड्या दुपारी एक नंतर एकामागोमाग उभ्या राहिल्या. सायन, माटुंगा, चुनाभट्टी इत्यादी भागात पाणी साचल्याचे रेल्वे प्रशासनाने आधीच प्रवाश्याना कळवले असते, आणि सीएसटीएमकडे जाणाऱ्या गाड्या आधीच सुरक्षित अश्या जवळच्या स्थानकात थांबवल्या असत्या तर लाखो प्रवासी मधल्यामध्ये पाण्यामध्ये अडकून पडले नसते.

मुंबईत १२ वर्षांनंतर इतका पाऊस पडल्याने मुंबईत पाणी साचल्याचे पालिका सांगत आहे. अश्या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीचे अधिकार मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले तेव्हा रहिवाशी वस्तीमधील, रस्त्यावरील लोकांनी आजूबाजूच्या सुरक्षित ठिकाणी आडोसा घेत आपला जीव वाचवला. परंतू यापेक्षा उलट परिस्थिती रेल्वेमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांची होती. काही ठिकाणी कंभरभर तर काही ठिकाणी छाती इतक्या पाण्यातून प्रवासी वाट काढत जवळचे स्थानक गाठत होते. पाण्याखाली असलेले नाले गटारे याची कल्पना नसल्याने जीव मुठीत घेऊन प्रवाश्याना पाण्यामधून बाहेर पडावे लागले आहे.

कुर्ला आणि सायन दरम्यान थांबलेल्या लोकलमधील शेकडो प्रवासी चुनाभट्टी बाजूच्या भिंतीवर चढून बाहेर पडत होते. गर्दी आणि भिंतीवरून बाहेर पडताना प्रवाश्याना अपघात होऊ नये म्हणून पालिकेच्या आपत्कालीन विभागाशी संपर्कात असताना हि भिंत थोडीशी तोडल्यास प्रवाश्याना बाहेर पडत येईल असे मी सायंकाळी ४ - ५ वाजता सांगितले होते. यावर हि भिंत रेल्वेची आहे, ती तोडण्यासाठी रेल्वेची परवानगी घ्यावी लागेल असे सांगण्यात आले. सायंकाळी अंधार पडेपर्यंत लोकलमधील बहुतेक प्रवासी निघून गेल्यानंतर रात्री ११ - १२ नंतर भिंत तोडण्यासाठी जेसीबी पाठवण्यात आल्या.

लोकलमधील बहुतेक प्रवासी निघून गेले असले तरी लोकलमध्ये अपंग, अंध, वयोवृद्ध, गरोदर महिला, लहान मुले महिला प्रवासी रुळावरील पाणी कमी होण्याची वाट बघत बसले होते. रुळावरील पाणी रात्रीचे १२ वाजून गेले तरी कमी झाले नव्हते. लोकलच्या दरवाज्यापर्यंत पाणी यायला एक फुटाचे अंतर बाकी होते. अश्या परिस्थितीत मी व माझ्या सहकारी असलेले काशिनाथ म्हादे, मोहम्मद मुकीं शेख हा सर्व अनुभव , श्रीरंग सुर्वे, या पत्रकारांनी आपले सोर्स वापरून सायंकाळी पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे आणि अग्निशमन दलाकडे मदत मागितली. हि मदत रात्री १ वाजता पोहचली.

पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडे मागितलेल्या मदतीनंतर आम्ही अडकलेल्या लोकलच्या एका बाजूस कुर्ला एल विभागाची तर एका बाजूस एफ नॉर्थची हद्द असल्याने सहाय्यक आयुक्त केशव उबाळे, एल विभागातील अधिकारी सतत संपर्कात होते. मात्र मदत करण्यास हद्दीचा प्रश्न उभा राहिलेला दिसत होता. रात्री ९ ते १० दरम्यान एक अग्निशमन दलाची गाडी कुर्ला एलबीएस रोडवरून मदतीला आली. त्यांना आम्ही ट्रेन मध्ये कुठे आहोत हे समजले. मात्र हि गाडी पुढे गेली आणि इतर लोकलमधील प्रवाश्याना बाहेर काढल्यावर रात्री दिड वाजता ज्यांनी मदतीचा कॉल दिला होता त्यांना काढण्यात आले.

पाण्यामधून प्रवाश्याना बाहेर काढायचे असल्याने मदतीला आलेल्या अग्निशमन दलाकडे बोट किंवा तराफा यासारखी कोणतीही उपकरणे नव्हती. एक रशी आणि भिंतीवरुन बाहेर पडण्यासाठी एक शिडी हीच उपकरणे दिसली. अग्निशमन दलाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी २ नंबरवर उभी असलेली लोकल आणि एलबीएस रोड यामधील अंतर जास्त होते. एक नंबर ट्रॅक जवळ गटार आहे याची माहिती देऊनही अग्निशमन दलाची गाडी तिकडे असल्याने रेस्क्यू करण्यासाठी लांबचे अंतर पसंद केले. एका महिला गरोदर महिला पत्रकाराला व नंतर दोन अंध महिलांना बाहेर काढताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांचा पाय त्या गटारात गेल्याने खाली पाण्यात गेले, याबरोबर त्यांच्या हातात असलेल्या महिलाही पाण्यात डुबून निघत होत्या. त्यानंतर मात्र पत्रकारांनी ४ नंबरच्या भिंत जवळ आहे त्या भिंतीवरून बाहेर पडण्याचा पर्याय सुचवल्यावर लोकलमधील अंध, अपंग, महिला अश्या सर्वच प्रवाश्याना सुखरूप बाहेर काढण्यात आले.

या सर्व प्रकारावरून रेल्वेने रुळावर पाणी साचले असल्यास आधीच अलाउन्समेंट करून ट्रेन बंद करायला हव्यात. पाणी वाढण्याची शक्यता असल्यास लोकल पुन्हा उलट दिशेने स्टेशनमध्ये नेऊन प्रवाश्याना स्टेशनमध्ये सुखरूप सोडायला हवे. ट्रेन बंद झाल्यावर ट्रेनमधील अनेक मोटरमन ट्रेन आहे तिथेच टाकून जवळच्या स्टेशनमध्ये पळून गेले. अश्या वेळी प्रवाश्यांचा संताप वाढतो. यामुळे मोटरमनने लोकलमधील प्रवाश्याना सतत शीर देण्याचे काम काण्याची गरज आहे, मोटरमनलाही प्रशासनाकडून २९ ऑगस्टला काहीही माहिती देण्यात येत नव्हती असे सांगण्यात येत आहे, याची रेल्वे प्रशासनाने दखल घ्यायला हवी.

पालिकेच्या वॉर्डमधील आपत्कालीन विभागाने मुख्यालयातील आपत्कालीन विभागाकडून मदतीचा संदेश मिळताच आपण मुंबईकर करदात्या नागरिकाला मदत करत असल्याने आणि ती व्यक्ती आपल्या भारताची नागरिक असल्याने हद्दीच्या वादात पडण्याची गरज नाही. आपत्कालीन परिस्थितीत एक भिंत कोणात्या प्रशासनाची आहे त्यापेक्षा ती भिंत तोडल्याने किती प्रवासी सुखरूप बाहेर काढता येतील याचा विचार केला असता तर अर्ध्या तासात भिंत तोडता आली असती. मदत पोहचण्याससुद्धा उशीर झाला या काळात काहीही होऊ शकले असते याचे भान ठेवण्याचीही गरज आहे.

मुंबईत रस्त्यावर आणि ट्रेनच्या ट्रॅकवर पाणी साचले होते. अग्निशमन दलाच्या गाड्या मदतीला पाठवताना त्यासोबत एक दोन रेस्क्यू बोटी पाठवल्या असत्या तर अंध अपंग आणि गरोदर महिला प्रवाश्यांना रेस्क्यू करताना रात्री दिड वाजता अंधारातून धडपडत काढावे लागले नसते. हा सर्व अनुभव मी स्वतः व माझे पत्रकार मीत्र काशिनाथ म्हादे, मोहम्मद मुकीम शेख यांनी दुपारी दिड ते रात्री दिड या १२ तासा दरम्यान घेतला आहे. या अनुभवातून आपत्कालीन व्यवस्थापनेचा बोजवारा उडाल्याचे दिसले. आपत्कालीन व्यवस्थापन आणखी सुधारावे, मदतीची अपेक्षा करणाऱ्यांना वेळेवर मदत मिळावी यासाठी हा अनुभव येथे देत आहे. यामधून काही बोध राज्य सरकार, पालिका आयुक्त अजोय मेहता, आपत्कालीन व्यवस्थापन विभाग, आणि रेल्वे प्रशासनाने घेण्याची गरज आहे.

अजेयकुमार जाधव

Post Bottom Ad