मुंबई । प्रतिनिधी -
रेल्वे मार्गावरील प्रवाश्यांची वाढती संख्या पाहता येत्या १ ऑक्टोबरसापासून पश्चिम, मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोयीसाठी लोकलच्या ६० जादा फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये पश्चिम रेल्वेवर ३२, मध्य रेल्वेवर १२ तर हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वेमार्गावर प्रत्येकी १४ फेऱ्या चालवण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावर या लोकलच्या फेऱ्या वाढणार असल्याने उपनगरातील रेल्वे प्रवाश्याना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
रेल्वेवरील प्रवाश्यांचे प्रमाण पश्चिम रेल्वेवर आहे. यामुळे पश्चिम रेल्वेवर ३२ लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. यामध्ये २९ फेऱ्या उपनगरातील मार्गावर चालवण्यात येतील. २९ पैकी २० फेऱ्या अंधेरी ते विरार दरम्यान आणि दादर ते विरार दरम्यान ९ जादा लोकल फेऱ्या चालवल्या जातील. तर ३ फेऱ्या चर्चगेटपर्यंत चालवण्यात येणार आहेत. यातील सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रत्येकी चार लोकल फेऱ्या धावतील. त्यामुळे उपनगरातील प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. पश्चिम रेल्वेवर दररोज १३२३ लोकल फेऱ्या होतात. जादा फेऱ्यांमुळे फेऱ्यांची संख्या ही १३५५ पर्यंत पोहोचेल. नवीन फेऱ्या चालवताना अंधेरी ते बोरिवलीपर्यंतच्या पाचव्या मार्गिकेचाही वापर केला जाईल. या मार्गिकेवरून सात लोकल फेऱ्या चालवल्या जातील. तसेच मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल या हार्बर आणि ठाणे ते पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावर प्रत्येकी १४ अशा एकूण २८ वाढीव फेऱ्याही चालवण्यात येणार आहेत.