मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर आणि रेल्वेमार्गावर पाणी साचल्याने दुपारपासून रस्त्यावर आणि ट्रॅकवर गाड्या अडकून पडल्याचे चित्र मंगळवारी ठिकठिकाणी दिसून आल्याने. मुंबईकरांना २६ जुलैची आठवण झाली. आणि २६ जुलैचा हा पार्ट २ची झलक असल्याचे अलगद अनेक मुंबईकर नागरिकांच्या तोंडून येत होते.
मुंबईत रविवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दुपारी ११.३० च्या सुमारास मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सायन परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळहळू माटुंगा स्थानक, दादर ते परेल, मशिद स्थानकाजवळील रुळावर आणि हार्बरवरील कुर्ला, वडाळा, चुनाभट्टी स्थानकांजवळही पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली. मध्य रेल्वेच्या हार्बर लाइनसह पश्चिम रेल्वेच्या अनेक मार्गांवर पाणी साचल्याने हजारो प्रवासी स्टेशनवरच अडकून पडले होते.
मुंबईत रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने मंगळवारी रौद्र रूप धारण केले. जोरदार पावसामुळे दुपारी ११.३० च्या सुमारास मध्य रेल्वेच्या कुर्ला ते सायन परिसरात पाणी साचण्यास सुरुवात झाली. त्यानंतर हळहळू माटुंगा स्थानक, दादर ते परेल, मशिद स्थानकाजवळील रुळावर आणि हार्बरवरील कुर्ला, वडाळा, चुनाभट्टी स्थानकांजवळही पाणी साचण्यास सुरुवात झाल्याने रेल्वेसेवा विस्कळीत झाली. अखेर सीएसएमटी ते ठाणे दरम्यानची लोकलसेवा बंद करण्यात आली. दादर-माटुंगा मार्गावर अनेक लोकल खोळंबून पडल्या होता. कल्याण ते कर्जत, खोपोली आणि अंधेरी ते डहाणू अशी लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली होती. रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद झाल्याने अनेक ठिकाणी गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. दक्षिण मुंबईत येणारे हजारो चाकरमानी सीएसटी आणि चर्चगेट परिसरातच अडकून पडले होते. रात्री उशिरापर्यंत रेल्वेसेवा सुरू न झाल्याने अनेकांना रात्रभर घराबाहेर राहावे लागले.
पश्चिम रेल्वेवर वांद्रे, एल्फिस्टन रोड, माटुंगा, माहीम या भागात दुपारी एकनंतर पाणी साचण्यास सुरुवात झाली. चर्चगेट ते अंधेरीपर्यंतच्या चारही मार्गांवरील लोकल बंद करण्यात आल्याने सर्वच स्टेशनांवर प्रवाशांनी गर्दी केली होती. दुपारी अनेक कार्यालयांना सुट्टी देण्यात आल्याने गर्दी वाढली. त्यामुळे अनेक प्रवाशांनी रेल्वे रूळावरून चालणे पसंत केले. अनेकांनी पर्याय म्हणून रस्ते वाहतुकीकडे आपला मोर्चा वळविला पण रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे रस्ते वाहतूकही पूर्णपणे कोलमडली होती. पाणी साचल्याने अनेक बसगाड्या रस्त्यावरच बंद पडल्या. पावसाचा जोर लक्षात घेत टॅक्सी, ओला, उबेर यांनी गाड्या बंद करून थांबण्यातच धन्यता मानली. अनेक ठिकाणी गाड्यांमध्ये पाणी गेल्याने हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन आणि कुर्ला कुर्ला या भागात वाहतुकी कोंडी झाली होती.